मृत तरुणीची ओळख पटली; ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रियकरानेच केला 'तिचा' खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 03:45 PM2022-07-11T15:45:34+5:302022-07-11T15:52:53+5:30
तरुणी आमला येथील कृष्णा ज्वेलर्समध्ये काम करीत असल्याची माहिती तिच्या आईने दिल्याने बिंग फुटले आणि आराेपी पाेलिसांच्या हाती लागले.
नागपूर / काटाेल : चारगाव (ता. काटाेल) शिवारात साेमवारी (दि. ४) सकाळी आढळून आलेल्या मृत तरुणीची ओळख पटली. या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिच्या प्रियकरास अटक केली असून, एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे. तिच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिचा खून केल्याने त्याने सांगितले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली.
मुस्कान अशाेक काचेवार (१९, रा. वाॅर्ड क्रमांक १०, आमला, जिल्हा बैतुल, मध्य प्रदेश) असे मृत तरुणीचे तर पुनीत सुनील साेनी (२८, रा. वाॅर्ड क्रमांक ५, गणेश काॅलनी, आमला, जिल्हा बैतुल, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी प्रियकराचे नाव आहे. या प्रकरणात एका विधिसंषर्घग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले असून, ताे पुनीतच्या दुकानातील नाेकर आहे.
चारगाव शिवारात साेमवारी (दि. ४) सकाळी अनाेळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला हाेता. तिचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने काटाेल पाेलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साेशल मीडिया व इतर माध्यमांचा वापर केला. दरम्यान, मुस्कानची आई लता अशाेक काचेवार (४५) यांनी फाेटाेवरून तिला ओळखल्याने ओळख पटली. ती आमला येथील कृष्णा ज्वेलर्समध्ये काम करीत असल्याची माहिती तिच्या आईने दिल्याने बिंग फुटले आणि आराेपी पाेलिसांच्या हाती लागले.
'ती' करायची ब्लॅकमेल
मुस्कान आमला येथील कृष्णा ज्वेलर्समध्ये काम करायची. कामानिमित्त ती अनेकदा बाहेरगावी जायची. पुनीत हा त्या दुकानातचा मालक असून, वर्षभरापूर्वी त्या दाेघांचे सुत जुळले. तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केल्याची माहिती पुनीतने पाेलिसांना दिली. ती वारंवार पैसे मागायची, तसेच तिने आय फाेनसाठी तगादा लावला हाेता. ती सतत ब्लॅकमेल करीत असल्याने आपण तिचा काटा काढल्याचेही पुनीतने पाेलिसांना सांगितले.
आय फाेन घेऊन देण्याचा बहाणा
पुनीतने मुस्कानला रविवारी (दि. ३) आय फाेन विकत घेऊन देण्याच्या बहाण्याचे बाेलावले. तिला स्वत:च्या वाहनात बसवून दुकानात काम करणाऱ्या १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकास साेबत घेतले. तिघेही आमला येथून नागपूरच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांनी मुस्कानचा खून केला आणि मृतदेह चारगाव शिवारातील वीटभट्टीमागे फेकून आमला येथे परत गेले होते.