लो होल्टेजमुळे जवानांचा वाढला बीपी, रोखली 'आर्मी स्पेशल ट्रेन'
By नरेश डोंगरे | Published: July 25, 2023 09:04 PM2023-07-25T21:04:59+5:302023-07-25T21:05:07+5:30
अनेक तासांपासून पंखे अन् एसीही बंद : नागपूर यार्डात झाली दुरूस्ती : ११ तासांनंतर रवाना
नागपूर : बंद पडलेले पंखे, एसी सुरू होण्याचे नाव घेत नसल्याने सैन्य दलाच्या जवानांचा रोष उफाळून आला. नागपूर रेल्वेस्थानक येताच त्यांनी ही 'आर्मी स्पेशल ट्रेन' रोखून धरली. तब्बल ११ तासांच्या दुरूस्तीनंतर सैन्याच्या जवानांनी भरलेली 'आर्मी स्पेशल' पुढच्या प्रवासाला रवाना झाली.
लष्कराच्या जवानांनी भरलेली विशेष रेल्वेगाडी सोमवारी रात्री सिकंदराबादहून जम्मूकडे निघाली. सिकंदराबादपासून काही अंतर पार करत नाही तोच गाडीतील लाईट, पंखे, एसी, चालू-बंद होऊ लागले. काही वेळेनंतर कमी पॉवर (लो होल्टेज)मुळे विजेवर चालणारी सर्व उपकरणे असून नसल्यासारखी झाली. प्रचंड उकाड्यामुळे सैन्यातील अधिकारी, जवान घामाघुम होऊन प्रचंड अस्वस्थ झाले. आता होईल, थोड्या वेळानंतर सुरळीत होईल, असे वाटत असल्याने जवानांनी हा त्रास सहन केला.
मात्र, पाच ते सात तास होऊनही एसीच काय साधा पंखाही सुरू होत नसल्याने जवानांचा रोष उफाळून आला. मंगळवारी सकाळी ६.५८ वाजता ही आर्मी स्पेशल नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर आली. त्यानंतर गाडीतील मेजर यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांनी तातडीने अभियंत्यांना पाचारण केले. नेमका काय बिघाड आहे, ते शोधून काढण्याचे आदेश मिळाले. पाहणीत या गाडीच्या बऱ्याचशा बॅटरीज खराब असल्याने 'लो होल्टेज'ची समस्या निर्माण झाली आणि त्याचमुळे एसीसह सर्व उपकरणे निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. परिणामी तातडीने दुरूस्ती सुरू करण्यात आली. तब्बल ११ तासांच्या परिश्रमानंतर रेल्वेगाडीतील बिघाड दुरूस्त करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ६.२८ वाजता ही आर्मी स्पेशल जम्मूकडे रवाना झाली.
'जय हिंद'चा नारा अन् जोशात घेतला निरोप
ट्रेनला दुरूस्तीसाठी तब्बल ११ तास लागले. तरीसुद्धा जवानांनी कोणतीही आगळीक केली नाही. ते सर्व शांतपणे दुरूस्तीच्या कामाकडे बघत होते. आमची काही मदत होऊ शकते का, अशीही त्यांनी या दरम्यान अनेकदा रेल्वे अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. दुरूस्ती होऊन ट्रेन निघायला सज्ज असताना जवानांनी रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले. एकसाथ 'जय हिंद'चा जोरदार नारा लावून त्यांनी मोठ्या जोशात नागपूरकरांचा निरोप घेतला.