ब्रह्मपुरी ते नागपूर ८ पोलिस ठाणे, तरी रेती माफियांचेच आहे 'राज'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 02:47 PM2023-04-04T14:47:20+5:302023-04-04T14:49:15+5:30
बिनधास्तपणे कोट्यवधींची रेती येते नागपुरात; घाटमालक व मोटारमालकांना नाही टेन्शन
नागपूर : ब्रह्मपुरी ते नागपूर या १५० किलोमीटरच्या मार्गावर ८ पोलिस स्टेशन असून, वाहतूक पोलिस व एलसीबीचेही पथक आहे. शेकडो कर्मचारी, दोन डझन वाहने, कारवाईचे अधिकार असतानाही खाकी मात्र रेती चोरीच्या प्रकरणात हतबल दिसतेय. कारण या सर्वांचे खिशे गरम होत असल्याने घाटमालक व मोटारमालक बिनधास्तपणे कोट्यवधींची रेती चोरून सरकारचा महसूल बुडवित आहे.
लोकमतने ब्रह्मपुरी, सिंदेवाही तालुक्यातील वाकल, विरव्हा, रणमोचन, सोंदरी या घाटावर प्रत्यक्ष भेट देऊन घाटावर सुरू असलेला रेतीचा अतिरिक्त उपसा त्यावरून होत असलेली कोट्यवधीची रेती चोरी छायाचित्रासह प्रसिद्ध केली. घाटाजवळील गावातून रेतीच्या ट्रकांची वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. रेतीच्या अवजड ट्रकांमुळे उडणारी धूळ, गावातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, धुळीमुळे गावालगतच्या शेतातील पिकेही खराब होत आहेत. गावातून निघालेले रेतीचे ट्रक ब्रह्मपुरीतून सिंदेवाही मार्गाने तळोदी पोलिस स्टेशनसमोरून नागभिड पोलिस स्टेशनच्या हद्दीतून कानपा फाट्यावरून भिवापूर पोलिस स्टेशनच्या मागील हद्दीतून भिसी पोलिस स्टेशनच्या परिसरातून उमरेडमध्ये पोहचताना दिसले. पुढे उमरेड पोलिस स्टेशन, कुही पोलिस स्टेशनच्या हद्दीतून ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांदेखत एलसीबीचा धाक न बाळगता नागपुरात आले. या मार्गावरून रेतीची चोरी करताना ट्रकचालकाला ८ पोलिस स्टेशन पार करावे लागत आहे. एवढी मोठी यंत्रणा असतानाही करोडो रुपयांची रेती चोरी होत आहे.
- चंद्रपुरातील ठाण्यांना महिन्याकाठी रसद
चोरीच्या रेतीच्या ट्रकांचा पाठलाग करीत असताना लोकमतच्या पथकाला सिंदेवाहीच्या शिवाजी चौकात दोन पोलिसांचे वाहने दिसली. याच रस्त्यावर तळोदी पोलिस स्टेशनही होते. कानपा फाट्यावरही सायंकाळी राईस मिलजवळ पोलिसांच्या दोन गाड्या होत्या. ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन अंतर्गत रेतीघाट आहेत आणि नागभीड पोलिस स्टेशनच्या हद्दीतून रेतीचे ट्रक नागपूरकडे येत आहेत. ओव्हरलोड रेती भरलेले हे ट्रक, भरधाव वेगाने धूळ उडवित जात असतानाही, या ट्रकांवर नंबरप्लेट नसतानाही कारवाई होताना दिसत नाही. घाटावर असलेल्या लोकांनीच सांगितले की, हे चारही पोलिस स्टेशन आमचे आहे. याचाच अर्थ येथे महिन्याला रसद पुरविली जाते.
- भिवापूर, भिसी, उमरेड, कुही पोलिस ठाण्यांची एन्ट्री मोटारमालक देतात
रेती चोरीच्या या व्यवसायातीलच सूत्रांनी सांगितले की, भिवापूर, भिसी, उमरेड आणि कुही पोलिस स्टेशन प्रत्येक गाडीमागे १० हजार रुपये गाडीमालकाला एन्ट्रीसाठी द्यावे लागते. जवळपास ३०० ट्रक या रस्त्यावर रेतीची वाहतूक करतात. एन्ट्री वसूल करण्यासाठी उमरेडमध्ये जुनघरे तर भिवापूरमध्ये लाला व कानपा ते भिसीदरम्यान एन्ट्री वहीद नावाचा दलाल आहेत. सोबतच उमरेड व भिवापूर ठाण्यात कार्यरत सख्खे बंधू वसुलीत सक्रिय आहेत. कुही पोलिस ठाण्याची एन्ट्री एक कनिष्ठ अधिकारी व एका शिपायाच्या मार्फत वसूल केली जाते. सोबतच वाहतूक पोलिस व एलसीबीची प्रत्येकी १० हजारांची एन्ट्री लागलीच आहे. त्यामुळे कारवाईला कुणी पुढे येत नाही. पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना विचारल्यावर म्हणतात, आम्हीच का कारवाई करावी, प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरीच्या रेतीची वाहतूक सुरू आहे. लोकमतकडे या सर्वांचे नाव देखील आहे.
- जावयाला संरक्षण देण्यासाठी सासऱ्याने केली बदली
एका पीएसआयचा जावई रेती, मुरुम वाहतुकीच्या व्यवसायात सक्रिय आहे. त्याचे काही ट्रकही आहेत. त्याच्या व्यवसायाला संरक्षण मिळावे म्हणून एका पीएसआयने दोन वर्षांपूर्वी ग्रामीणमध्ये बदली करून घेतल्याची चर्चा या व्यवसायात सक्रिय असलेल्यांमध्ये आहे.