‘ब्रह्मोस’चा डाटा पाकिस्तानी ‘बॉस’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:24 AM2018-10-10T11:24:25+5:302018-10-10T11:26:06+5:30

ब्रह्मोससाठी भारत आणि रशियातील शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून परिश्रम घेत होते. मात्र, लाखोंच्या आमिषाने बुद्धी गहाण ठेवणाऱ्या निशांत अग्रवालमुळे दोन्ही देशातील शास्त्रज्ञांच्या परिश्रमावर पाणी फेरले जाते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

'Brahmos' data to Pakistani 'boss' | ‘ब्रह्मोस’चा डाटा पाकिस्तानी ‘बॉस’कडे

‘ब्रह्मोस’चा डाटा पाकिस्तानी ‘बॉस’कडे

Next
ठळक मुद्देशत्रूराष्ट्राच्या गुप्तहेरांची व्यवस्थाभारत-रशियाचे कौशल्य डावावर

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पराकोटीचे कौशल्य आणि तेवढ्याच गोपनीयतेने घडविण्यात येणाऱ्या ब्रह्मोससाठी भारत आणि रशियातील शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून परिश्रम घेत होते. मात्र, लाखोंच्या आमिषाने बुद्धी गहाण ठेवणाऱ्या निशांत अग्रवालमुळे दोन्ही देशातील शास्त्रज्ञांच्या परिश्रमावर पाणी फेरले जाते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
होय, हेरगिरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या अग्रवालकडून पाकिस्तान तसेच कॅनडात बसलेल्या बॉसकडे ब्रह्मोस संबंधीची बरीचशी माहिती पोहोचल्याचा धोकावजा संशय सूत्रांनी व्यक्त केला आहे. शत्रू राष्ट्राच्या गुप्तहेरांनी केलेल्या व्यवस्थेमुळे हा धोका व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निशांतच्या लॅपटॉप आणि संगणकातील डाटा पाकिस्तान तसेच कॅनडातील 'बॉस'कडे रोज अपलोड होत होता. तशी व्यवस्थाच गुप्तहेरांनी केली होती. सेजल कपूर आणि नेहा शर्मा नामक फेसबुक फ्रेण्डने अनुक्रमे कॅनडा तसेच पाकिस्तानमध्ये तगड्या रकमेच्या नोकरीचे आमिष दाखवून निशांतला फितवले. तो गलेलठ्ठ पगाराच्या पॅकेजवर विदेशात काम करायला तयार झाल्यानंतर त्याला सेजल आणि नेहाने आपल्या 'बॉस'सोबत बोलायला सांगितले. त्यानुसार, त्याने 'बॉस'सोबत संपर्क साधला. बॉसने त्याला आतापर्यंत काय उत्कृष्ट कामगिरी केली, पुढे काय करू शकता, अशी विचारणा केली. तसे आॅनलाईन प्रेझेंटेशन द्यायला सांगितले. त्यासाठी अग्रवालला कथित 'बॉस'ने एक लिंक पाठविली. ही लिंक डाऊनलोड केल्यानंतर अग्रवालच्या संगणक, लॅपटॉपमधील डाटा रोजच्या रोज बेमालूमपणे पाकिस्तान, कॅनडात बसलेल्या बॉसच्या लॅपटॉपवर अपलोड होऊ लागला. अर्थात् निशांत अग्रवाल नागपुरातील युनिटमध्ये ब्रह्मोससंबंधी जे काही काम करायचा ते सर्वच्या सर्व शत्रूराष्टांना सहजपणे कळत होते. सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू झाला होता.

मिलिटरी इंटेलिजन्सची नजर
फेसबुक फ्रेण्डच्या नावाखाली हनी ट्रॅप लावून कानपुरातील महिला अन् नागपुरातील अग्रवालकडून शत्रूष्ट्राचे हेर संवेदनशील माहिती काढून घेत असल्याची शंका तीन महिन्यांपूर्वी मिलिटरी इंटेलिजन्सला आली. तेव्हापासून या दोघांवर सूक्ष्म नजर रोखली गेली. ती महिला आणि निशांत अग्रवाल एका विशिष्ट आयडीवर वारंवार आॅनलाईन प्रेझेन्टेशन देत असल्याचे उघड झाले. त्यामुळे रविवारी, ७ आॅक्टोबरला त्या महिलेला मिलिटरी इंटेलिजन्सने यूपी एटीएसच्या मदतीने ताब्यात घेतले. तर इकडे अग्रवालला बेड्या ठोकण्यासाठी मिलिटरी इंटेलिन्स, यूपी एटीएस तसेच महाराष्ट्र एटीएसने तयारी केली. रविवारी या सर्व चमू तसेच एटीएसच्या नागपूर युनिटचे एसपी औरंगाबादहून नागपुरात पोहचले. सोमवारी सकाळी एकाच वेळी छापामारी करण्यात आली. विशेष म्हणजे, अग्रवालला अटक केल्यानंतर तपास यंत्रणांमधील अधिकाऱ्यांनी डीआरडीओच्या ब्रह्मोस एरोस्पेस प्लँट विभागातील अनेकांची विचारपूस केली. ३६ तासानंतरही चौकशी सुरू होती. तपास पथके मंगळवारी रात्रीपर्यंत ठिकठिकाणी चौकशी करीत होती.

पत्नीने हटकले होते !
हेरगिरीसारख्या गंभीर आरोपात निशांत अग्रवाल ऐन तारुण्यात पकडला गेल्याने त्याच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचे वडील प्रदीपकुमार अग्रवाल नामांकित डॉक्टर तर आई गृहिणी असून, बहीणही मोठ्या हुद्यावर सेवारत असल्याचे समजते. ते आज नागपुरात पोहोचले होते. विशेष म्हणजे, निशांत रात्रंदिवस सेजल आणि नेहासोबत आॅनलाईन चॅटिंग करीत असल्याचे लक्षात आल्याने त्याच्या पत्नी क्षितिजाने त्याला काही दिवसांपूर्वीच हटकले होते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. चॅटिंग करणाऱ्या या दोघींचेही अकाऊंट क्षितिजाने ब्लॉक केल्याची माहिती पुढे आली आहे.

हैदराबादमध्येही ‘लिंक’
अग्रवालच्या नियमित संपर्कात हैदराबादमधीलही एक व्यक्ती होती, अशी माहिती खास सूत्रांकडून मिळाली आहे. त्याचा शोध घेतला जात असल्याचे समजते. तर, ती व्यक्ती कॅनडात पळून गेली असावी, असा संशय एका दुसऱ्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, अग्रवालला यंग सायंटिस्ट अवॉर्ड मिळाला. त्याने हा फोटो आणि माहिती त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर अपलोड केली. तेव्हापासून अग्रवाल शत्रू राष्ट्रातील गुप्तहेरांच्या नजरेत आला होता, अशी वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे.

Web Title: 'Brahmos' data to Pakistani 'boss'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.