दृष्टिहीन प्रवाशांसाठी ब्रेल लिपीचे सांकेतिक बोर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 09:33 PM2018-03-09T21:33:35+5:302018-03-09T22:39:42+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दृष्टिहीन प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रमुख रेल्वेस्थानकांवर ब्रेल लिपीचे सांकेतिक बोर्ड उपलब्ध करून दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दृष्टिहीन प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रमुख रेल्वेस्थानकांवर ब्रेल लिपीचे सांकेतिक बोर्ड उपलब्ध करून दिले आहेत.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने इतवारी रेल्वेस्थानकाच्या तिकीट बुकींग काऊंटर, प्रसाधनगृह, वेटिंग हॉल, रिटायरींग रुम, डॉरमेटरी, वॉटर बूथ आदी ठिकाणी एकूण ५६ ब्रेल लिपीचे सांकेतिक बोर्ड लावले आहेत. याशिवाय प्रवेशद्वारावर स्पर्श केल्यानंतर समजेल असे रेल्वेस्थानकाचे दोन नकाशे लावले आहेत. या सुविधेमुळे इतवारी रेल्वेस्थानकावर दृष्टिहीन प्रवासी कुणाच्याही मदतीविना आपल्याला हवे ते स्थान शोधू शकणार आहेत. ही सुविधा सर्वप्रथम इतवारी रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय गोंदियात १२३ बोर्ड, भंडारा ५० बोर्ड, बालाघाट ४२ बोर्ड, कामठीत ३४ बोर्ड लावण्यात आले आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.