लाचखोराच्या बांधल्या मुसक्या

By Admin | Published: July 24, 2014 01:07 AM2014-07-24T01:07:18+5:302014-07-24T01:07:18+5:30

विणकराचे ओळखपत्र देण्यासाठी आठ हजारांची लाच मागणाऱ्या विणकर सेवा केंद्राच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयच्या पथकाने अटक केली.

Brain built bribe | लाचखोराच्या बांधल्या मुसक्या

लाचखोराच्या बांधल्या मुसक्या

googlenewsNext

आठ हजार स्वीकारले : विणकर सेवा केंद्राचा उपसंचालक फसला
नागपूर : विणकराचे ओळखपत्र देण्यासाठी आठ हजारांची लाच मागणाऱ्या विणकर सेवा केंद्राच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयच्या पथकाने अटक केली.
एच. बी. सूर्यवंशी असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. ते विणकर सेवा केंद्रात उपसंचालक आहेत. ताजनगर मानेवाडा येथील रहिवासी मोहम्मद कादीर शेख तय्यब हे आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून विणकाम (विणकर) करतात. त्यांचा सतरंजीचा कारखानाही आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी विणकरांचे अधिकृत ओळखपत्र असणे आवश्यक आहे. हे ओळखपत्र उपसंचालक, विणकर सेवा केंद्रातून मिळते. त्यामुळे मोहम्मद कादीर शेख तय्यब तसेच त्यांचे काका शेख चांद ताजी यांनी उपसंचालक कार्यालयात विणकराचे ओळखपत्र मिळावे म्हणून रीतसर अर्ज केला होता.
बरेच दिवसांपासून झुलवाझुलव सुरू असल्यामुळे शेवटी मोहम्मद कादीर यांनी उपसंचालक सूर्यवंशी यांची भेट घेतली. सूर्यवंशींनी कादीर तसेच त्यांचे काका शेख चांद यांना ओळखपत्र देण्यासाठी प्रत्येकी चार हजार (एकूण आठ हजार रुपये) लाच द्यावी लागेल, असे सांगितले. साध्या ओळखपत्रासाठी आठ हजारांची मागणी अवास्तव वाटल्यामुळे कादीर यांनी आपल्या ओळखींच्यांकडे तक्रार केली.
एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून सीबीआयचे अधीक्षक संदीप एम. तामगाडगे यांच्याकडे लाचखोर सूर्यवंशीची २२ जुलैला तक्रार करण्यात आली. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर अधीक्षक तामगाडगे यांनी आज कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार आज दुपारी सीबीआयचे निरीक्षक नीरज गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाईचा सापळा लावला. ठरल्याप्रमाणे कादीर लाचेची रक्कम घेऊन सूर्यवंशी यांच्याकडे गेले. सूर्यवंशींनी लाचेची रक्कम स्वीकारताच सीबीआयच्या पथकाने त्यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयच्या पथकाने कार्यालयाचीही झडती घेतली.
ओळखपत्रासाठी अडवणूक
नागपुरात टेक्सटाईल्स पार्क सुरू होणार असल्याच्या घोषणेने विणकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कारण टेक्सटाईल्स पार्कचा थेट फायदा विणकरांना मिळणार आहे. त्यामुळे आपल्याकडे ओळखपत्र असावे म्हणून प्रत्येक विणकर धडपडतो आहे. त्याचा गैरफायदा उठवून ओळखपत्रासाठी विणकरांची अडवणूक केली जात आहे. त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जात आहे, आजच्या कारवाईतून ते अधोरेखित झाले आहे.

Web Title: Brain built bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.