पुरुषाच्या अवयवदानाने तीन महिलांना मिळाले नवजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 03:15 PM2022-03-22T15:15:22+5:302022-03-22T15:28:39+5:30
फुलचंद सिंगी यांचा रक्तगट ‘ओ निगेटिव्ह’ होता. अशा व्यक्तीकडून अवयदान होणे दुर्मीळ. परंतु कमी वेळात हे सर्व जुळून आल्याने तिघांना नवे जीवन मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, या तिन्ही महिला आहेत. एकूणच हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ ठरले.
नागपूर : ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगट असलेल्या दात्याकडून अवयव उपलब्ध होणे हे जेवढे दुर्मीळ तेवढेच दुर्मीळ स्वीकारकर्ता रुग्ण उपलब्ध होणे ! झेडटीसीसीच्या पुढाकाराने हे शक्य झाले. ५५ वर्षांच्या पुरुषाच्या अवयवदानामुळे तीन महिलांना जीवनदान मिळाले.
सतनामीनगर लकडगंज येथील रहिवासी फुलचंद सिंगी (५५) त्या अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, १३ मार्च रोजी फुलचंद यांच्या डाव्या बाजूला अचानक अशक्तपणा आला. तातडीने न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आठ दिवसांच्या शर्तीच्या उपचारानंतर २० मार्चला डॉक्टरांच्या पथकाने त्यांना ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषित केले. फुलचंद यांचे भाऊ डॉ. गौतम सिंगी यांनी पत्नी रेणू व मुलगी शिवानी यांना अवयदान करण्यासंदर्भात समुपदेशन केले. आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी त्या दु:खातही मायलेकीने अवयवदानाला होकार दिला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. संजय कोलते यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन कॉर्डिनेटर वीणा वाठोडे यांनी पुढीलप्रक्रिया पूर्ण केली.
- दोन किडनी व यकृताचे दान
फुलचंद यांच्या दोन्ही किडनी व यकृताचे दान करण्यात आले. यकृत न्यू इरा हॉस्पिटलच्या ५३ वर्षीय महिलेला, पहिली किडनी याच हॉस्पिटलच्या ४० वर्षीय महिलेला, तर दुसरी किडनी दुसऱ्या एका खासगी हॉस्पिटलमधील ४२ वर्षीय महिलेला दान करण्यात आली.
- दुर्मीळ प्रकरण
‘झेडटीसीसी’च्या झोन कॉर्डिनेटर वीणा वाठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले, फुलचंद सिंगी यांचा रक्तगट ‘ओ निगेटिव्ह’ होता. अशा व्यक्तीकडून अवयदान होणे दुर्मीळ. त्यातल्या त्यात हे अवयव स्वीकारणारे रुग्णही याच रक्तगटाचे हवे असतात. परंतु कमी वेळात हे सर्व जुळून आल्याने तिघांना नवे जीवन मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, या तिन्ही महिला आहेत. एकूणच हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ ठरले.
- या डॉक्टरांनी केली मदत
यकृत प्रत्यारोपण डॉ. राहुल सक्सेना, डॉ. साहिल बन्सल आणि डॉ. स्नेहा खाडे यांनी केले. पहिले किडनी प्रत्यारोपण डॉ. शब्बीर राजा, डॉ. शिवनारायण आचार्य व डॉ. रवि देशमुख यांनी केले. तर, दुसरे किडनी प्रत्यारोपण डॉ. संजय कोलते, डॉ. सूर्यश्री पांडे, डॉ. निशांत बावनकुळे यांनी केले.