मेंदूच्या आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक
By admin | Published: December 21, 2015 03:21 AM2015-12-21T03:21:32+5:302015-12-21T03:21:32+5:30
नियमित शारीरिक व्यायामामुळे मेंदूच्या रचनेत व कार्यावर निश्चितच सकारात्मक फायदे दिसून येतात,
चंद्रशेखर मेश्राम : इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरोलॉजीची पदयात्रा
नागपूर : नियमित शारीरिक व्यायामामुळे मेंदूच्या रचनेत व कार्यावर निश्चितच सकारात्मक फायदे दिसून येतात, असा निष्कर्ष नव्या संशोधनांती काढण्यात आल्याची माहिती वरिष्ठ मज्जारोग तज्ज्ञ व इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरोलॉजीचे माजी अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली. इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरोलॉजीच्यावतीने आयोजित ‘राष्ट्रीय मेंदू सप्ताह’ाच्या निमित्ताने आयोजित पदयात्रेनंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.
पदयात्रेला हिरवी झेंडी आमदार डॉ. मिलिंद माने यांदी दाखविली. यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धेने, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. सुधीर भावे, डॉ. सुनील गुप्ता, डॉ. राजू खंडेलवाल आदी उपस्थित होते. पदयात्रा, टिळक पत्रकार भवन येथून निघाली.
पंचशील चौक, व्हेरायटी चौक होऊन पुन्हा टिळक पत्रकार भवनात आली. यावेळी मोठ्या संख्येत वैद्यकीय विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीचा समारोप तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानंतर करण्यात आला.
यावेळी डॉ. मेश्राम म्हणाले, रोज व्यायाम करण्याने न करणाऱ्यांच्या तुलनेत स्मृतिभ्रंश ‘डिमेन्शिया’ विकार जडण्याची शक्यता ३० टक्के कमी होते. ५५ वर्षांचे वय झाल्यावर एक ते दोन टक्के मेंदू लोप पावतो. व्यायामाने बुद्धी तरतरीत राहते. अभ्यास लक्षात राहतो व शिकण्याची प्रक्रियाही दृढ होते. मेंदू कार्यशील राहतो. मज्जारज्जू सुरक्षित राहण्यास मदत होते. शारीरिक हालचाल व परिश्रमामुळे अल्झायमर व कंपवात विकृती होण्याचा संभाव्य धोका कमी होतो, असेही ते म्हणाले.
व्यायामाने चित्त प्रसन्न राहते. कामात मन लागते. सकारात्मकता येते, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांंनी व्यक्त केले. डॉ. सुनील गुप्ता म्हणाले, व्यायामाने मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयाघात याचे प्रमाण घटते. मेंदूवर अल्प रक्त संचाराने होण्याचा दुष्परिणामाचा धोकाही कमी होतो. पूर्वी असा समज होता की, केवळ बाल्यावस्थेतच मेंदूची वाढ होते. पण हल्लीच्या संशोधनात तो चुकीचा असून प्रौढ वयांत सुद्धा तो सक्रिय व वाढत असतो. (प्रतिनिधी)