ध्वनी-वायू प्रदूषणामुळे मेंदूला इजा : डॉक्टरांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 10:08 PM2021-01-11T22:08:22+5:302021-01-11T22:10:17+5:30
Noise-air pollution Brain injury, nagpur news मेंदू खूप नाजूक असतो. त्याला वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषणामुळे इजा पोहोचू शकते. डास, कुत्री यांच्यामुळे होणाऱ्या आजारांचाही मेंदूवर परिणाम होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेंदू खूप नाजूक असतो. त्याला वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषणामुळे इजा पोहोचू शकते. डास, कुत्री यांच्यामुळे होणाऱ्या आजारांचाही मेंदूवर परिणाम होतो. रस्ते अपघातामुळे मेंदूला दुखापत होऊन जीव जाण्याची धोकाही असतो. या सर्व गोष्टी टाळल्या जाऊ शकतात व मेंदूला निरोगी ठेवले जाऊ शकते, असे मत मेंदूरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले.
‘डब्ल्यूएफएन’च्या ‘ट्रॉपिकल अँड जिओग्राफीकल न्यूरोलॉजी स्पेशलिटी ग्रुप वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी व इंडियन अॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजी’ यांच्या संयुक्त विद्यमाने मेंदू आरोग्य दिनानिमित्त आभासी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘इंडियन अॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजी’चे अध्यक्ष डॉ. जेएमके मूर्ती यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी मुंबईचे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ.सरोश कत्रक म्हणाले, शरीरातील प्रत्येक अवयव संचालित करण्याचे काम मेंदू करतोच, शिवाय, भाषा, संवाद, स्मृती, व्यक्तिमत्त्व, कल्पक विचार, भावनांचे नियंत्रणदेखील मेंदूद्वारे केले जाते. चेन्नई ‘आयएएन’चे सचिव डॉ. यू. मीनाक्षीसुंदरम् म्हणाल्या, मेंदू हा पाॅवर स्टेशन आहे. तेथून करंट निघाला, तर शरीर संचालित होते. डोकेदुखी, स्ट्रोक, एपिलिप्सी असे अनेक मेंदूशी संबंधित आजार असून, त्यावर उपचार करण्याचे काम न्यूरोलॉजिस्ट करतो. हैदराबादचे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट व स्ट्रोक विशेषज्ञ डॉ. सुभाष कौल म्हणाले, मेंदूला बाह्य कारणांसोबत मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, थायरॉइड या अंतर्गत समस्यांमुळेदेखील मेंदूला दुखापत होऊ शकते.
दोन जेवणाच्या वेळांमध्ये आठ तासांचे अंतर हवे
राष्ट्रीय संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, आपण जेव्हा जेव्हा खातो तेव्हा मेंदूतून इन्सुलिन प्रसवते. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. त्यातून शरीरात फॅट्स वाढतात. दोन जेवणाची वेळांमध्ये किमान ८ ते ९ तासांचे, तर उपवासाच्या वेळांमध्ये किमान १५ ते १६ तासांचे अंतर असले पाहिजे. परंतु, हे करताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
दुपारी १२ नंतर कॉफी, सायंकाळी ५ नंतर चहा घेऊ नये
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे म्हणाले, झोप मेंदूसाठी फार आवश्यक आहे. चांगल्या झोपेसाठी दुपारी १२ नंतर कॉफी आणि सायंकाळी ५ नंतर चहा घेऊ नये. झोपताना विचार करू नये. चांगली झोप यावी, यासाठी वातावरण निर्मिती करावी, असेही ते म्हणाले.