झिका विषाणूमुळे नवजात बालकांच्या मेंदूमध्ये विकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:48 AM2020-08-08T11:48:15+5:302020-08-08T11:48:42+5:30
कमी क्षमतेचा मेंदू , मिरगी आणि दीर्घकालीन अपंगत्व, हे जन्मजात झिका रुग्णामध्ये दिसून येते. या मुलांची आयुष्यभर काळजी घ्यावी लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झिका विषाणूचा सर्वात मोठा धोका गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भातील बालकांना असतो. या विषाणूमुळे आईच्या गर्भात असलेल्या बाळाच्या मेंदूची वाढ खुंटते आणि मेंदू विकसित न झालेले बाळ जन्माला येते, ज्याला ‘मायक्रोसेफली’ असे म्हणतात. ‘पॅन अमेरिकन फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजिकल सोसायटी’चे अध्यक्ष आणि झिकावरील संशोधनासाठी डब्ल्यूएफएन टास्क फोर्सचे सदस्य, प्राध्यापक मार्को तुलिओ मदीना यांनी ही माहिती जागतिक मेंदूसंसर्ग रोग मालिकेत दिली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी विभाग आणि फोरम फॉर इंडियन न्यूरोलॉजी एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मालिकेच्या तिसऱ्या सत्रावेळी ते ‘झिका’ आणि ‘अरबोव्हायरस इन्फेक्शन’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी इंग्लंडचे प्रा. क्रिस्तोफर केनार्ड आणि अमेरिकेचे प्रा. जॉन होते.
झिका हा एक विषाणू रोग -डॉ. मेश्राम
कमी क्षमतेचा मेंदू , मिरगी आणि दीर्घकालीन अपंगत्व, हे जन्मजात झिका रुग्णामध्ये दिसून येते. या मुलांची आयुष्यभर काळजी घ्यावी लागते. मायक्रोसेफली व्यतिरिक्त, मेंदूत विकृती आणि डोळ्यामध्ये विकृती देखील दिसतात. काही मुले मृत जन्माला येतात. नुकत्याच झालेल्या या आजाराच्या साथीचा सर्वाधिक फटका ब्राझीलला बसला. १७ लाख रुग्णांची नोंद झाली होती. झिका हा एक विषाणू रोग आहे, जो दिवसा सक्रिय असलेल्या अॅडिस एजिप्टी डास चावल्याने, संक्रमिताच्या शारीरिक संबंधातून आणि त्याला दूषित रक्त दिल्याने होतो.
झिका विषाणू सर्वप्रथम १९४७ मध्ये रिसस जातीच्या माकडामध्ये युगांडा येथील झिका जंगलात आढळून आला होता. २०१७ मध्ये भारतातील झिकाच्या प्रारंभीच्या घटना नोंदविण्यात आल्या. गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील बापूनगर भागात, तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात, २०१८ मध्ये राजस्थानमधील जयपूर येथे रुग्ण दिसून आले. जयपूरमध्ये १५७ रुग्णांची नोंद झाली, यात ६३ गर्भवती महिलांचा समावेश होता, अशी माहिती डब्ल्यूएफएनच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष आणि या मालिकेचे निर्देशक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.
अशी आहेत लक्षणे
डॉ. मेश्राम म्हणाले, ज्यांना विषाणूची लागण होते, त्यांना हलका ताप,त्वचेवर पुरळ येणे, डोळे येणे, स्नायू आणि सांधेदुखी किंवा डोकेदुखी आदी लक्षणे दिसून येतात. आजार सामान्यत: सौम्य असतो आणि लक्षणे सामान्यत: दोन ते दिवस असतात. विषाणूमुळे संक्रमित ८० टक्के लोकांना कोणताही त्रास होत नाही. मात्र काहींना मेंदूज्वर, मेंदूच्या वेष्टनाचा दाह, मायलेयटीस, दृष्टी कमी होणे आणि पक्षाघात देखील होतो. काही रुग्णांना श्वास घेण्यास आणि गिळण्यास देखील त्रास होतो. २५ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडते. योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो.
प्रभावी औषध किंवा प्रतिबंधक लस नाही
अलीकडच्या काही वर्षांत डेंग्यू, चिकनगुनिया आणि जपानी एन्सेफलायटीसने कहर निर्माण केला आहे. झिका विषाणूदेखील त्याच फ्लॅव्हिव्हायरस ग्रुपचा आहे आणि त्याच डासांद्वारे संक्रमित केला जातो. त्यामुळे आपल्या देशात झिका विषाणूच्या साथीचा धोका आहे. जयपुरात २०१८ मध्ये प्रथमच झिका विषाणू डासांमध्ये दिसून आले होते . या विषाणूविरुद्ध कोणतेही प्रभावी औषध किंवा प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. म्हणूनच डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणे आणि डासांच्या चावण्यापासून बचाव करणे हे महत्त्वाचे असल्याचे डॉ. मेश्राम यांनी सांगितले.