वर्धा जिल्ह्यातील ‘ब्रेनडेड’व्यक्तीकडून चौघांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:36 PM2018-02-17T23:36:54+5:302018-02-17T23:39:30+5:30
मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. शनिवारी एका ५२ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याने चार रुग्णांना जीवनदान मिळाले. या व्यक्तीचे हृदय चेन्नई, यकृत औरंगाबाद येथे तर दोन्ही मूत्रपिंड नागपूरच्या दोन वेगवेगळ्या रुग्णालयातील गरजू रुग्णांना मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. शनिवारी एका ५२ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याने चार रुग्णांना जीवनदान मिळाले. या व्यक्तीचे हृदय चेन्नई, यकृत औरंगाबाद येथे तर दोन्ही मूत्रपिंड नागपूरच्या दोन वेगवेगळ्या रुग्णालयातील गरजू रुग्णांना मिळाले.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील किन्हाळा येथील रहिवासी जनार्धन रामजी बोबडे (५२) असे त्या ब्रेनडेड (मेंदूमृत) व्यक्तीचे नाव. प्राप्त माहितीनुसार, बोबडे यांचा हिंगणघाटपासून दोन कि.मी. अंतरावर अपघात झाला. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना हिंगणघाट येथील रुग्णालयात आणि नंतर सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून, १४ फेबु्रवारी रोजी त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १६ फेबु्रवारी रोजी मेंदूमृत झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली. किन्हाळा गावातील कृषी केंद्राचे मालक विजय सिंग मोहता व ‘झेडटीसीसी’च्या सामाजिक कार्यकर्त्या वीणा वाठोरे यांनी बोबडे कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांना अवयवदानाबद्दल माहिती देऊन प्रबोधन केले. त्या दु:खातही कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. कुटुंबीयांकडून होकार मिळताच अवयव प्रत्यारोपणासाठी (आॅर्गन ट्रान्सप्लांट) वोक्हार्ट रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांच्या एक चमूने पुन्हा तपासणी करून मध्यरात्री अधिकृत ‘ब्रेन डेड’ घोषित केले. विभागीय प्रत्यारोपण समितीच्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. रवी वानखेडे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. समितीच्या आदेशाने मृत बोबडे यांच्यावर शनिवारी दुपारी शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली.
सहा मिनिटात यकृत पोहचले विमानतळावर
औरंगाबाद येथील एम.जी.एम. रुग्णालयातील डॉ. हुनैद व यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. पार्शनाथ राव हे चार्टर विमानाने वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तब्बल तीन तासांच्या शस्त्रक्रियानंतर बोबडे यांचे यकृत (लिव्हर) बाहेर काढले. वाहतूक उपायुक्त एस. चैतन्य यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड यांनी ग्रीन कॅरिडोर तयार केले. दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी शंकरनगरातून यकृत निघाले आणि अवघ्या सहा मिनिटात विमानतळावर पोहोचविण्यात आले. याच दरम्यान चेन्नई येथील फोर्टिस हॉस्पिटलचे हृदयरोग सर्जन डॉ. मोहन व त्यांची टीम विशेष विमानाने वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. शस्त्रक्रियेनंतर ग्रीन कॉरिडोअरच्यामदतीने हृदय विमानतळावर पाठविण्यात आले. तेथून हे हृदय चेन्नईला गेले.
२९वे अवयवदान
मेंदूमृत बोबडे यांची एक किडनी (मूत्रपिंड) वोक्हार्ट हॉस्पिटलमधील एका रुग्णाला, तर दुसरी किडनी आॅरेंज सिटी रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आली. दोन्ही बुबूळ महात्मे आय बँकेला दान करण्यात आले. या वर्षातील हे पहिले आणि ब्रेनडेड व्यक्तीकडून झालेले २९ वे अवयवदान ठरले आहे.