मूलभूत विज्ञानातील नव्या ‘ट्रेन्ड्स’वर होणार मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 09:26 PM2019-03-04T21:26:29+5:302019-03-04T21:30:07+5:30
शासकीय विज्ञान संस्था नागपूर आणि शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ‘मूलभूत विज्ञानातील उदयोन्मुख प्रवाह’ या विषयावर शासकीय विज्ञान संस्थेत दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये विज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच नवनवीन कल्पनांचे आदानप्रदान होणार आहे, अशी माहिती शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.आर.जी.आत्राम यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय विज्ञान संस्था नागपूर आणि शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ‘मूलभूत विज्ञानातील उदयोन्मुख प्रवाह’ या विषयावर शासकीय विज्ञान संस्थेत दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये विज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच नवनवीन कल्पनांचे आदानप्रदान होणार आहे, अशी माहिती शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.आर.जी.आत्राम यांनी दिली.
‘अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. शशिकुमार चित्रे यांच्या हस्ते ६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता शासकीय विज्ञान संस्थेत परिषदेचे उद्घाटन होईल. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, ‘बीएआरसी’चे अध्यक्ष डॉ. जतिंदर याखमी, राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए.डी. सावंत उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आर.जी. आत्राम राहतील. यावेळी शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे उपस्थित राहतील. परिषदेत भारताच्या विविध भागातील नामवंत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. यात राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए.डी. सावंत, गणितज्ज्ञ डॉ. ए.एस. मुक्तीबोध, ‘आयआयटी-पवई’चे माजी अधिष्ठाता डॉ. ए.के. सिंग, विज्ञान प्रसारचे डॉ. अरविंद रानडे, सांख्यिकी शास्त्रज्ञ डॉ. सुरेंद्र गोळे, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांचा समावेश आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेमागील उद्देश असल्याचे डॉ. आत्राम यांनी सांगितले. या परिषदेच्या आयोजनात ‘मेडा’, विज्ञान प्रसार, विज्ञान भारती, ‘राजेंद्र सिंह सायन्स एक्सप्लोरेटरी’, नारायणा आयएएस अॅकेडमी व ‘स्वच्छ नागपूर’ यांचे सहकार्य लाभले आहे.
परिषदेचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ ७ मार्चला दुपारी ३.३० वाजता होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे, ‘बायो केअर’चे संचालक डॉ. सुहास बुधे उपस्थित राहतील. यावेळी शासकीय न्याय वैद्यक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्र्रागडे, विज्ञान संस्थेच्या प्रा. सुजाता देव, प्रा. आशिष बढिये, नीती कपूर, प्रा. हंसी बंसल, विज्ञान संस्थेचे ग्रंथपाल प्रा. रामदास लिहितकर, ‘स्वच्छ नागपूर’ संस्थेच्या अनुसया काळे उपस्थित होत्या.
विद्यार्थीदेखील मांडणार संकल्पना
परिषदेत विद्यार्थी त्यांचे संशोधन व संकल्पना तोंडी आणि पोस्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडणार आहेत. यात ‘केमिकल सायन्सेस’, ‘मेडिसिनल केमिस्ट्री’, ‘क्वॉन्टम मेकॅनिक्स’, ‘इन्स्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजी’, ‘लाईफ सायन्स’, ‘मॅथेमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल सायन्सेस’, ‘फिजिकल सायन्सेस’, ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’, ‘फॉरेन्सिक सायन्सेस’, ‘सोलर एनर्जी’ या विषयांचा समावेश आहे.