रामटेक लोकसभेसाठी ‘हिंदू-दलित’ की ‘बौद्ध-दलित’ यावर भाजपमध्ये मंथन
By कमलेश वानखेडे | Published: January 4, 2023 01:14 PM2023-01-04T13:14:49+5:302023-01-04T13:16:12+5:30
अरविंद गजभिये, सुधीर पारवे यांची नावे चर्चेत : शिंदे गटाकडून खा. कृपाल तुमाने यांचा दावा
नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी विदर्भासह महाराष्ट्र दौरा करीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे रणशिंग फुंकले. राज्यातील ४८ पैकी ४५ जागा निवडून आणण्याचे लक्ष्य निश्चत केले. प्रत्येक जागा हमखास कशी निवडून आणता येईल, यासाठी रणनीती आखली जात आहे. रामटेक लोकसभेसाठी उमेदवार हिंदू दलित द्यावा की बौद्ध दलित यावरही गंभीर मंथन सुरू झाले असून पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून याचा गुप्त आढावा घेतला जात आहे.
रामटेकमध्ये खा. कृपाल तुमाने सलग दोनदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. दोन्ही निवडणुका ते भाजपशी युतीत शिवसेनेच्या तिकिटावर लढले. राज्यातील सत्तांतरानंतर तुमाने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. यावेळी भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेची (शिंदे गट) युती होईल व रामटेकची जागा शिंदे गटासाठी सोडली जाईल, असा विश्वास तुमाने समर्थकांना आहे. न्यायालयाचा निर्णय काही वेगळा लागला व शिंदे गट भाजपमध्ये विलीन करण्याची वेळ आली तर तुमाने भाजपकडून लढतील, असेही कयास लावले जात आहेत.
भाजपमध्ये एवढी वर्षे राबलेल्या व्यक्तीलाच यावेळी संधी द्यावी, असा सूर भाजपमध्ये लावला जात आहे. मात्र, उमेदवार हिंदू दलित द्यावा की बौद्ध दलित यावर वेगवेगळी मते आहेत. खा. कृपाल तुमाने हे देखील हिंदू दलित असून दोन्ही वेळा काँग्रेसने दिलेल्या बौद्ध दलित समाजाच्या उमेदवाराला पराभूत करूनच ते विजयी झाले आहेत. भाजपकडून जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये व उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवे यांची नावे चर्चेत आहेत. गजभिये हे बौद्ध दलित असून पारवे हे हिंदू दलित आहेत.
असे आहेत कळीचे मुद्दे
- रामटेक लोकसभेत सुमारे १६ ते १८ टक्के (३ लाख ४० हजार) मतदार हे अनुसूचित जाती (एससी) आहेत.
- यातील बौद्ध दलित मतदार हे सुमारे ९ टक्के असल्याचा अंदाज आहे.
- रामटेकची जागा बौद्ध दलित उमेदवाराला दिली गेली तर त्याचा फायदा नागपूर लोकसभेसाठीही होऊ शकतो.
- पण दहा वर्षांपासून हिंदू दलित उमेदवार येथून विजयी होत असताना ही जोखीम घेणे भाजपला परवडेल का ?
- काँग्रेसने पुन्हा बौद्ध दलित उमेदवार दिला तर या समाजाची गठ्ठा मते एकतर्फी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हिंदू दलित उमेदवार दिला तर भाजपच्या मतांची काहीअंशी विभागणी होऊ शकते.