एलआयटी युनिव्हर्सिटीच्या ‘ग्लोबल ॲल्युमनी मीट’ मध्ये नवीनता व संशोधनावर मंथन; रनायसन्स-२०२३ मध्ये पार पडले तांत्रिक सत्र
By जितेंद्र ढवळे | Published: December 15, 2023 07:50 PM2023-12-15T19:50:40+5:302023-12-15T19:51:34+5:30
यात तज्ज्ञांनी नवीनता व संशोधनावर मत व्यक्त केले.
नागपूर : लक्ष्मीनारायण इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) च्या जागतिक माजी विद्यार्थी मेळाव्याला (ग्लोबल ॲल्युमनी मीट : रनायसन्स - २०२३) शुक्रवारी अमरावती रोड स्थित लक्ष्मीनारायण इनोवेशन टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या परिसरात प्रारंभ झाला. आज पहिल्या दिवशी विविध कंपनी आणि संस्थांमधील तज्ज्ञांचे तांत्रिक सत्र पार पडले. यात तज्ज्ञांनी नवीनता व संशोधनावर मत व्यक्त केले.
एलआयटीला विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिलाच जागतिक माजी विद्यार्थी मेळावा असून देश-विदेशातून मोठ्या संख्येत माजी विद्यार्थी आलेले आहेत. येथे झालेल्या तांत्रिक सत्रात केमिकल अभियंता मृणाल दास, केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव डॉ. एस. चंद्रशेखर, झायडेक इंडस्ट्रीचे संचालक डॉ. अजय रांका, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे डॉ. उन्नत पंडित यांनी सहभाग नोंदवला.
मृणाल दास यांनी केमिकल इंजिनिअरिंग, त्यामधील विविध रोजगार, संशोधनाच्या संधीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. देशात १९२ केमिकल कंपनी असून तिथे रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. यातील अनेक कंपन्यांमध्ये एलआयटीचे विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत असल्याबद्दल दास यांनी समाधान व्यक्त केले.
डॉ. एस. चंद्रशेखर यांनी सायलेंट जनरेशन ते अल्फा जनरेशनपर्यंतच्या विविध जनरेशनमध्ये लोकांचे सरासरी आयुर्मान आणि हॅपिनेस इंडेक्स कसा वाढत गेला याचे सादरीकरण केले.
डॉ. राजेंद्र रांका यांनी नवीनता आणण्यासाठी शिक्षण प्रक्रियेत करावयाचे बदल या विषयावर आपले विचार मांडले. ‘चलता है’ ही मानसिकता खोडून काढत नवीन पिढीला बदलाचा मार्ग स्वीकारावा लागेल. एलआयटीला जर भविष्यात हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी सारखे व्हायचे असेल तर नवीनता आणि संशोधनाची कास धरावी लागेल, कठोर मेहनत करावी लागेल, असे मत डॉ. अजय रांका यांनी व्यक्त केले. डॉ. उन्नत पंडित यांनी उच्च शिक्षण, संशोधन, पेटेंटसाठीच्या आर्थिक बाबींचा उहापोह केला.
देशात आणि नागपुरातही इनोव्हेशन लॅब आहेत. त्यातले विद्यार्थी विविध समस्यांवर समाधान शोधत आहे. एलआयटी वेळेच्या पुढे असून येथील विद्यार्थी इनोव्हेशन लॅबची आता मागणी करू शकतात, असे ते म्हणाले. वक्त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले.
डॉ. एस. यू. मेश्राम यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. तांत्रिक सत्राला लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. राजू मानकर, लिटाचे अध्यक्ष माधव लाभे, डॉ. राजेश बिनिवाले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळच्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.