नागपुरातील बेलतरोडी भागात धाडसी घरफोडी; रोख आणि दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 08:49 PM2017-12-22T20:49:56+5:302017-12-22T20:50:23+5:30
बेलतरोडीतील आजूबाजूच्या दोन घरांच्या दारांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख आणि दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी भरदिवसा घडलेल्या या घरफोडीच्या घटना सायंकाळी उघड झाल्या.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : बेलतरोडीतील आजूबाजूच्या दोन घरांच्या दारांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख आणि दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी भरदिवसा घडलेल्या या घरफोडीच्या घटना सायंकाळी उघड झाल्या.
रवींद्र ताराचंद उरकुडे (वय ४२) हे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चक्रधर स्वामी लेआऊट, बेलतरोडी येथे राहतात. गुरुवारी दुपारी १.४० वाजता ते दाराला कुलूप लावून नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेले होते. सायंकाळी परत आले असता त्यांना दाराचे कुलूप तुटून दिसले. चोरट्यांनी आतमधील साहित्याची फेकाफेक करीत सोन्याचांदीचे दागिने आणि २ हजार रुपये असा १ लाख, १३ हजारांचा ऐवज चोरून नेला. उरकुडे यांनी या घटनेची माहिती देताच शेजाऱ्यांत खळबळ उडाली. त्यानंतर मोठ्या संख्येत नागरिक तेथे जमा झाले. हुडकेश्वर पोलिसांना कळविण्यात आले.
या घरफोडीची चर्चा सुरू असतानाच बाजूला राहणारे किशोर गोसाराम रहांगडाले (वय ४१) यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख तसेच सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा ७६ हजारांचा ऐवज लंपास केला. हुडकेश्वर पोलिसांनी उरकुडे आणि रहांगडाले यांच्या शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता गुरुवारी दुपारी १.४० ते २. ३० या वेळेत या दोन्ही चोरीच्या घटना घडल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.