नागपुरातील प्रतापनगरात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याकडे धाडसी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 07:19 PM2019-06-13T19:19:23+5:302019-06-13T19:20:35+5:30
प्रतापनगरातील एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या सदनिकेतून चोरट्यांनी पावणेचार लाखांचे दागिने चोरून नेले. बुधवारी भरदिवसा ही घरफोडीची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतापनगरातील एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या सदनिकेतून चोरट्यांनी पावणेचार लाखांचे दागिने चोरून नेले. बुधवारी भरदिवसा ही घरफोडीची घटना घडली.
शिवाजी बाबूलाल सूर्यवंशी (वय ५९) असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. शासनाच्या वजन मापे नियंत्रण विभागातून निवृत्त झालेले सूर्यवंशी प्रतापनगरातील भामटी परिसरातील सारनाथ बौद्धविहाराजवळ राहतात. साईकृपा अपार्टमेंटमधील पहिल्या माळ्यावर त्यांची सदनिका आहे. सदनिकेचे मुख्य दार आणि समोरच्या लोखंडी दाराला कुलूप लावून ते आणि त्यांची पत्नी बुधवारी दुपारी १ च्या सुमारास रामदासपेठेत गेले होते. दुपारी ४.२७ वाजता त्यांच्याकडे कुरियरवाला आला. त्यावेळी त्यांच्या दाराला कुलूप लावून होते. सायंकाळी ५.१५ च्या सुमारास सूर्यवंशी दाम्पत्य घरी परतले. तेव्हा त्यांना त्यांच्या दोन्ही दारांची कुलूपे तुटून दिसली. चोरट्यांनी स्टोअर रुमच्या कपाटात ठेवलेले ३ लाख ७३ हजारांचे दागिने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शेजाऱ्यांना आणि प्रतापनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक केवटी आणि त्यांचे सहकारी तेथे पोहचले. ठसे तज्ज्ञांचे पथकही बोलवून घेण्यात आले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही शोधले मात्र परिसरात कुठेही सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांबाबत धागादोरा मिळाला नाही. सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
चार दिवसांतील दुसरी घटना
प्रतापनगरात चार दिवसांत झालेली धाडसी घरफोडीची ही दुसरी घटना होय. खामल्यातील एका डॉक्टरच्या निवासस्थानाहून चोरट्यांनी आठ लाखांची रोकड पळविली होती. अद्याप त्याचा छडा लागलेला नाही.