निवृत्त निबंधकांकडे धाडसी घरफोडी : कुख्यात सुल्ली आणि साथीदारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:30 AM2021-01-06T00:30:29+5:302021-01-06T00:36:14+5:30
Brave burglary at retired registrar, crime news अनेक गंभीर गुन्ह्यात पोलिसांना वॉन्टेड असलेला कुख्यात गुन्हेगार सुल्ली ऊर्फ सूर्यकांत प्रभाकर राजुरकर आणि त्याच्या दोन साथीदारांना सक्करदरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि दागिन्यांसह साडेपाच लाखांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक गंभीर गुन्ह्यात पोलिसांना वॉन्टेड असलेला कुख्यात गुन्हेगार सुल्ली ऊर्फ सूर्यकांत प्रभाकर राजुरकर आणि त्याच्या दोन साथीदारांना सक्करदरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि दागिन्यांसह साडेपाच लाखांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला.
७ डिसेंबर २०२० ला सुल्लीने त्याचा साथीदार संदीप ऊर्फ खांडेराव विठ्ठल इंगोले आणि राहुल द्वारकाप्रसाद गुजरच्या मदतीने सक्करदऱ्यातील निवृत्त न्यायालय रजिस्ट्रार दीपक खसाळे यांच्याकडे धाडसी घरफोडी केली होती. रोख आणि २० तोळे सोने असा एकूण ६ लाख ७७ हजारांचा ऐवज त्यांनी लंपास केला होता.
मीनाक्षी दीपक खसाळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपींकडे असलेल्या दुचाकीचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून माग काढला तेव्हा ही घरफोडी करणारा आरोपी जाटतरोडीतील कुख्यात गुंड सुल्ली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. गेल्या आठवड्यात सुल्ली सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागला. तो सक्करदऱ्यातील गुन्ह्यात वॉन्टेड असल्याचे कळाल्याने सीताबर्डी पोलिसांनी त्याला सक्करदरा पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी सुल्ली, संदीप आणि राहुल यांच्याकडून चोरीच्या एकूण सोन्यापैकी ५ लाख ६५ हजारांचे सोने आणि दुचाक्यांसह ६ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला. पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, सहायक आयुक्त बी. एन. नलावडे, ठाणेदार सत्यवान माने, द्वितीय निरीक्षक चंद्रकांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सागर अव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
नागपुरात असूनही पोलिसांना दिसत नव्हता
सुल्ली कुख्यात गुन्हेगार आहे. तो जाटतरोडीत राहतो. त्याने दीड वर्षापूर्वी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाची हत्या केली होती. तेव्हापासून तो फरार होता. त्याच्याविरुद्ध दोन डझन गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवर वॉन्टेड असलेला सुल्ली पोलिसांना सापडत नव्हता. मात्र तो नागपुरातच राहून संधी मिळेल तेव्हा चोरी, घरफोडी, लुटमारी करीत होता.