प्रशासनाचा चुकीनंतरही भावाचे अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय
By सुमेध वाघमार | Published: February 6, 2024 06:28 PM2024-02-06T18:28:20+5:302024-02-06T18:28:33+5:30
मनोज शेंडे (२३) रा. हिंगणघाट मानोरा वर्धा त्या अवयवदात्याचे नाव. त्याचे आई-वडिल शेतीचे कामे करतात.
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्याचा अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान ‘ब्रेन डेथ’ झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. प्रशासनाच्या चुकीमुळे भावाचा मृत्यू झाल्याचे शल्य त्याला होते. त्यानंतरही त्याने लहान भावाचे अवयव दान करण्याचा करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या मानवतावादी निर्णयाने तिघांना जीवनदान मिळाले.
मनोज शेंडे (२३) रा. हिंगणघाट मानोरा वर्धा त्या अवयवदात्याचे नाव. त्याचे आई-वडिल शेतीचे कामे करतात. त्याला तीन भाऊ आहेत. मनोज हा बी.ए. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. प्राप्त माहितीनुसार, २ फेब्रुवारी रोजी मनोज काही कामानिमित्त नागपुरला आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर रात्री १० वाजताच्या सुमारास वर्धाकडे दुचाकीने निघाला होता. अचानक रस्त्यात मोठा खड्डा आला. त्याची दुचाकी खड्ड्यात अडकून तो पडला. त्याचा मेंदूला मार बसला. लगेच त्याला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. त्याचा मेंदूमध्ये तीव्र रक्तस्त्राव झाला होता. दोन दिवस झालेल्या उपचाराला तो प्रतिसाद देत नव्हता. त्याची प्रकृती न्युरोलॉजीकलदृष्ट्या खालवली. डॉक्टरांच्या एका पथकाने त्याला तपासून ‘ब्रेन डेथ’ म्हणजे मेंदू मृत घोषीत केले. ‘एम्स’चे समन्वयक प्रतीम त्रिवेदी व प्राची खैरे यांनी मनोजचा मोठा भाऊ सूरज शेंडे (२६) याचे समुपदेशन करीत अयवदानाची माहिती दिली. रस्त्यावरील खड्ड्याने घेतलेला भावाचा हकनाक बळीचे शल्य सूरजला होते. परंतु सोबतच भावाला अवयवरुपी जीवंत ठेवण्यासाठीही त्याचे मन सांगत होते. अखेर त्याने भावाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
‘एम्स’मध्ये १३ वे अयवदान
‘एम्स’मध्ये ‘ब्रेन डेथ’ झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे योग पद्धतीने समुपदेशन केले जात असल्याने आतापर्यंत १३ व्यक्तींकडून अयवदान होऊ शकले. यात एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. भरतसिंग राठोड, इंटेन्सिव्हिस्ट डॉ. सुचेता मेश्राम व डॉ. अनु केवलानी यांचा मोठा वाटा आहे.