बहाद्दर आजीबाईंनी चोरट्याला केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 10:58 AM2019-05-29T10:58:30+5:302019-05-29T11:00:17+5:30
चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका २६ वर्षीय चोरट्याची ८० वर्षीय आजीने चांगलीच जिरवली. त्याची गचांडी धरून आरडाओरड करीत कुटुंबीयांना तसेच शेजाऱ्यांना जागे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका २६ वर्षीय चोरट्याची ८० वर्षीय आजीने चांगलीच जिरवली. त्याची गचांडी धरून आरडाओरड करीत कुटुंबीयांना तसेच शेजाऱ्यांना जागे केले. त्यांच्या माध्यमातून पोलिसांना बोलवून या चोरट्याला पोलीस कोठडीत टाकण्याची कामगिरी बजावली.
जख्ख म्हातारपणातही दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसाचा परिचय देणाºया या आजीबाईचे नाव सत्यभामा खवसे आहे. ८० वर्षीय सत्यभामा खवसे आजी म्हणून परिसरात ओळखल्या जातात. त्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रप्रस्थनगरात राहतात. रविवारी रात्री त्यांचा मुलगा आणि परिवारातील अन्य सदस्य आतमध्ये झोपले होते तर, खवसे आजी बाहेरच्या रूममध्ये झोपून होत्या. उकाड्यामुळे त्यांनी दाराला कडी लावण्याचे टाळले.
मध्यरात्री अचानक कुणीतरी घरात शिरल्याचे त्यांना जाणवले. चोरटा आतमध्ये जाण्याच्या तयारीत असतानाच विलक्षण चपळाई आणि धाडसाचा परिचय देत आजीने चोरट्याची गचांडी धरली.
त्याला घट्ट पकडून ठेवत त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आतमध्ये झोपलेला मुलगा देवीदास तसेच अन्य सदस्य आणि शेजारची मंडळी धावली. त्यांनी चोरट्याला पकडले. त्याची बेदम धुलाई केली. सोेनेगाव पोलिसांनाही सूचना दिली. गस्तीवरील सोनेगावचे पोलीस पथक काही वेळेतच दाखल झाले. त्यांनी जमावाच्या तावडीतून चोरट्याला ताब्यात घेतले.
प्रदीप करधाम (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत खवसे आजींच्या घरात शिरण्यापूर्वी बाजूच्या घरात शिरून प्रदीपने चोरी केल्याची कबुली दिली. तेथून त्याने एक मोबाईल चोरल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी प्रदीपला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.
खवसे आजीचे
सर्वत्र कौतुक
८० वर्षीय खवसे आजीने दाखविलेले धाडस आणि प्रसंगावधान परिसरात चर्चेचाच नव्हे तर कौतुकाचाही विषय ठरला आहे. तिच्या प्रसंगावधानतेमुळेच चोरटा प्रदीप पोलिसांच्या कोठडीत पोहचला.