ब्राव्हो! ‘अ’ दर्जा मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:11 AM2021-09-08T04:11:27+5:302021-09-08T04:11:27+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी मंगळवारचा दिवस अतिशय सुखद ठरला. ‘नॅक’च्या (नॅशनल असेसमेन्ट ॲण्ड ॲक्रेडिटेशन कौन्सिल) ...
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी मंगळवारचा दिवस अतिशय सुखद ठरला. ‘नॅक’च्या (नॅशनल असेसमेन्ट ॲण्ड ॲक्रेडिटेशन कौन्सिल) परीक्षेत विद्यापीठाने बाजी मारली असून ‘अ’ दर्जा मिळविण्यात यश मिळविले आहे. सलग दुसऱ्यांना विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळाला आहे. वाढत्या रिक्त जागा, कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्या यांवर मात करूनदेखील विद्यापीठाने दर्जा कायम राखला हे विशेष.
‘नॅक’ समितीने २ ते ४ सप्टेंबरदरम्यान विद्यापीठाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी विद्यार्थी, संशोधक, माजी विद्यार्थ्यांशीदेखील संवाद साधला होता. विद्यापीठातील विविध पदव्युत्तर विभागांतील प्रगतीचा आलेख, संशोधनकार्य, इत्यादींबाबत बारीकसारीक बाबींची चिकित्सा केली होती.
‘नॅक’ समिती पाहणी करून गेल्यानंतर आठवड्यभरात विद्यापीठाच्या श्रेणीबाबत माहिती कळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र अनपेक्षितपणे केवळ चारच दिवसांत ‘नॅक’चा निकाल विद्यापीठाला कळला.
काणे, चौधरी, येवले ‘हिट’
गेल्या काही वर्षांमध्ये माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, तसेच विद्यमान कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यापीठात सकारात्मक बदल घडवून आणले होते. विशेषत: संशोधन आणि दर्जावर त्यांचा जास्त भर होता. कोरोनाच्या कालावधीतदेखील विद्यापीठातील पीएच.डी.चे वायव्हा ऑनलाईन घेण्यात आले. शिवाय डॉ. चौधरी यांच्या नेतृत्वात ऑनलाईन परीक्षांमध्ये विद्यापीठानेच सर्वांत चांगली कामगिरी केली.
रंगीत तालमीचा झाला फायदा
कुठल्याही परिस्थितीत यंदा ‘अ’ श्रेणी मिळावी यासाठी प्रशासनाने जोरदार प्रयत्न केले होते. ‘नॅक’च्या दौऱ्यासाठी सादरीकरणाचा ‘रोड मॅप’ तयार करण्यात आला. शिवाय काही आठवड्यांअगोदर तज्ज्ञ मंडळींचा समावेश असलेल्या समितीच्या उपस्थितीत रंगीत तालीमदेखील झाली होती. समितीसमोर विभागाचे जास्तीत जास्त चांगले सादरीकरण कसे होईल, समितीसमोर कसे बोलायचे इत्यादी मुद्द्यांवर विभागप्रमुखांना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले होते. प्रत्येक विभागात ‘पॉवरपॉइंट’ सादरीकरण देण्यात आले होते. संबंधित समितीने ज्या त्रुटी समोर आणल्या, त्या दूर करून प्रत्यक्ष ‘नॅक’समोर विद्यापीठाने परीक्षा दिली.