विदर्भातील मातीत फुलणार ब्राझीलची रसदार मोसंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 09:24 AM2017-12-26T09:24:12+5:302017-12-26T09:27:47+5:30

भारतीय कृषी संशोधन परिषद-लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (सीसीआरआय)ने येथील वातावरणाशी जुळवून घेतील अशा ब्राझिलमधील मोसंबीच्या पाच प्रजाती विकसित केल्या आहेत.

Brazilian juicy Mosambi now full bloom in Vidarbha | विदर्भातील मातीत फुलणार ब्राझीलची रसदार मोसंबी

विदर्भातील मातीत फुलणार ब्राझीलची रसदार मोसंबी

Next
ठळक मुद्देसीसीआरआयचे यशस्वी संशोधनपंजाब, आसाममधून उन्नत प्रजातींचीही भर

आॅनलाईन लोकमत
नागपूर : आपल्या रसदार गुणांमुळे ब्राझिलमध्ये लोकप्रिय असलेल्या मोसंबीच्या प्रजाती आता नागपूरसह विदर्भाच्या भूमीवर फुलणार आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषद-लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (सीसीआरआय)ने येथील वातावरणाशी जुळवून घेतील अशा ब्राझिलमधील मोसंबीच्या पाच प्रजाती विकसित केल्या आहेत. याशिवाय संस्थेने पंजाबमधील मोसंबीच्या तीन आणि आसाममधील लिंबाच्य प्रजातींची यशस्वीपणे लागवड केली आहे. या प्रजाती रोगमुक्त असून अधिक रसदार असल्याने प्रक्रिया उद्योगासाठी अधिक लाभदायक ठरतील, असा विश्वास सीसीआरआयचे संचालक डॉ. एम. एस. लदानिया यांनी व्यक्त केला.
डॉ. लदानिया यांनी विकसित केलेल्या मोसंबी आणि लिंबूच्या विविध प्रजातीबाबत माहिती दिली. या प्रजाती संस्थेने २०१४ मध्ये ब्राझिलहून आयात करून त्यांची संस्थेच्या भूमीवर लागवड करण्यात आली. उन्हाळ्यात तब्बल ४५ ते ४६ अंशावर जाणाऱ्या तापमानात या प्रजाती टिकाव धरणार की नाही हे मुख्य आव्हान संस्थेसमोर होते. मात्र तीन वर्षाचे संशोधन व मशागतीनंतर प्राथमिक स्तरात वाढलेल्या झाडांवर यावर्षी फुले आणि फळे यायला सुरुवात झाली आहे. नव्याने विकसित केलेल्या या प्रजातींमध्ये मुख्यत्वे हॅमलीन, पेरा, नटाल, व्हॅलेन्शिया आणि वेस्टीन यांचा समावेश आहे. या प्रजातींमध्ये गोडवा तर आहेच, मात्र सोबत भरपूर रस देण्याची क्षमताही आहे. यातील नटाल ही प्रजाती सर्वाधिक लाभदायक असल्याचा दावा डॉ. लदानिया यांनी केला. यामध्ये ४० ते ४५ टक्के रस देण्याची क्षमता आणि अधिक गोडपणा असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रजातींसाठी जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम या कंपनीशी करार करण्यात आला असून त्यांनी लागवड आणि शेतकऱ्यांना वितरण सुरू केल्याचे स्पष्ट केले. याशिवाय संस्थेने पंजाबमधील काही मोसंबीच्या प्रजाती विदर्भाच्या वातावरणात विकसित केल्या आहेत. यामध्ये ब्लड रेड, पाईनॅप्पल आणि जाफा यांचा समावेश आहे. या मोसंबीचे झाड संस्थेमध्ये प्राथमिक स्तरात वाढले असून ६० ते ७० फळे देत आहेत. झाड वाढल्यानंतर फळांची संख्या ५०० च्यावर जात असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रजाती सुद्धा रसदार असून प्रक्रिया उद्योगासाठी लाभदायक आहेत. यासोबतच संस्थेने अमेरिकेमध्ये लोकप्रिय असलेल्या ग्रॅप फ्रू टच्या स्टार रुबी, रेड ब्लश, मार्श सीडलेस आदी प्रजाती विकसित केल्या आहेत. या सर्व प्रजातींवर आणखी दोन ते तीन वर्ष निरीक्षणात ठेवण्यात येणार असून त्यानंतर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येतील.विदर्भात उपलब्ध असलेल्या प्रजाती प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने मागे असून या नवीन प्रजाती शेतकऱ्यांना आणि उद्योजकांनाही लाभदायक ठरतील, असा दावा त्यांनी केला. यावेळी संस्थेचे वैज्ञानिक डॉ. सोनकर, डॉ. हुच्छे आदी उपस्थित होते.

लिंबूच्या नवीन प्रजातींचेही संशोधन
संस्थेने संत्र्यासोबतच लिंबू फळांच्या इतर राज्यातील प्रजातींना विदर्भातील उष्ण वातावरणानुसार विकसित केले आहे. यामध्ये ‘आसाम लेमन’, ‘पंत लेमन’यांचा समावेश आहे. याशिवाय संस्थेने संशोधित केलेले ‘बारमासी लेमन’ हे विशेष आहे. बाराही महिने फळे देणारी ही प्रजाती शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल. विशेष म्हणजे यामध्ये रसाची क्षमता पारंपरिक प्रजातींपेक्षा दुपटीने अधिक आहे. या प्रजाती विशिष्ट तंत्राने रोगमुक्त करण्यात आल्या असून अधिक रसदार आणि अधिक काळ टिकू शकतील अशा पद्धतीने विकसित केल्याचे डॉ. लदानिया यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Brazilian juicy Mosambi now full bloom in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती