सुधारित पाणीपुरवठा याेजनेला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:09+5:302021-06-09T04:11:09+5:30
नत्थू घरजाळे लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी रामटेक शहरासाठी २०१९ साली नवीन सुधारित पाणीपुरठा याेजनेला ...
नत्थू घरजाळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी रामटेक शहरासाठी २०१९ साली नवीन सुधारित पाणीपुरठा याेजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यासाठी १६ काेटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ही नवीन सुधारित पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित हाेणे अपेक्षित असताना, स्थानिक नगर परिषद प्रशासनाला तिसऱ्या टप्प्यातील निधी न मिळाल्याने या याेजनेला सध्या ‘ब्रेक’ लागला आहे.
रामटेक शहराला पाणीपुरवठा करणारी आधीची पाणीपुरवठा याेजना ही ४५ वर्षांपूर्वीची आहे. ही याेजना १९७५ साली कार्यान्वित करण्यात आली हाेती. या याेजनेची पाणीपुरवठा क्षमता ही प्रतिदिन १५ लाख लिटरची आहे. या ४५ वर्षांत शहराच्या नागरीकरणासाेबतच लाेकसंख्येत वाढ झाल्याने पाण्याच्या मागणीतही वाढ झाली. त्यामुळे स्थानिक पालिका प्रशासनाने सुधारित पाणीपुरवठा याेजनेचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला सादर केला. शासनाने या याेजनेला मंजुरी देत १६ काेटी रुपयांची तरतूद केली.
सध्या रामटेक शहरात ४,८०० नळ कनेक्शन आहेत. प्रतिदिन २५ लाख लिटर पाणीपुरवठा क्षमता असलेल्या या सुधारित याेजनेच्या कामाला मार्च २०२० मध्ये सुरुवात करण्यात आली. ही याेजना मार्च २०२१ मध्ये कार्यान्वित हाेणार असल्याचेही सांगण्यात आले हाेते. याच काळात काेराेना संक्रमणामुळे लाॅकडाऊनची घाेषणा करण्यात आल्याने ही याेजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. या याेजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील निधी प्राप्त न झाल्याने याेजनेचे काम सध्या थांबले आहे, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.
...
रस्ते दुरुस्तीसाठी पाच काेटींची गरज
शहरात नव्याने नळ कनेक्शन देण्यात आले असून, काही ठिकाणी नवीन पाईप टाकण्यात आले आहेत. त्यासाठी शहरातील बहुतांश राेड खाेदण्यात आले आहेत. पाईप टाकण्यासाठी खाेदण्यात आलेली नाली केवळ माती टाकून बुजविली आहे. यातील काही माती दबली तर काही धूळ व चिखलाच्या रूपात निघून गेली. त्यामुळे या नाल्या खाेलगट झाल्या असून, त्या अपघातांना निमंत्रण देत आहे. या संपूर्ण राेडची दुरुस्ती करण्यासाठी पाच काेटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...
या सुधारित पाणीपुरवठा याेजनेचे काम सुरू आहे. काेराेना संक्रमणामुळे या याेजनेच्या कामाचा वेग मंदावला आहे. या याेजनेची सर्व कामे दाेन महिन्यात पूर्ण केली जाईल.
- हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी,
नगर परिषद, रामटेक.
...
या याेजनेचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील निधी प्राप्त हाेताच दाेन महिन्यात उर्वरित २० टक्के काम पूर्ण करण्यात येईल.
- राेहित भाेईर, अभियंता,
पाणीपुरवठा विभाग, रामटेक.