नागपूरच्या गोरेवाड्यातील ‘इंडियन सफारी’ला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:55 AM2018-07-27T10:55:28+5:302018-07-27T11:01:29+5:30
आंतरराष्ट्रीय गोरेवाडा वन्यजीव क्षेत्रात प्रस्तावित ‘इंडियन सफारी’ची महत्त्वाकांक्षी योजना थंडबस्त्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
योगेंद्र शंभरकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय गोरेवाडा वन्यजीव क्षेत्रात प्रस्तावित ‘इंडियन सफारी’ची महत्त्वाकांक्षी योजना थंडबस्त्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत इंडियन सफारीचे काम पूर्णत्वास येईल आणि याच काळात या योजनेचे उदघाट्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र दरवेळी उपराजधानीत होणारे हिवाळी अधिवेशन यावेळी मुंबईला करण्याची घोषणा झाल्यामुळे गोरेवाडा सफारीचा वेग मंदावला आहे. सफारी योजनेच्या डिझाईनमध्ये बदल केल्याने वेळ लागणार असल्याचे वक्तव्य अधिकारी करीत असले तरी, अधिवेशनाच्या स्थानबदलाचा परिणाम नाकारता येत नाही.
गोरेवाडातील इंडियन सफारी भागीदारीतून विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. याअंतर्गत जानेवारी २०१८ मध्ये मुंबईतील ‘एक्सेल वर्ल्ड’ या कंपनीशी करार करण्यात आला आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने आफ्रिकन व इतर सफारी योजनांची कामे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनाआधी गोरेवाडा इंडियन सफारीचे काम नोव्हेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे दावे केले जात होते. मात्र हे दावे कमकुवत ठरले आहेत. जुलैच्या मुसळधार पावसामुळे सफारी क्षेत्रातील निर्माणाधीन इमारतींचे केवळ प्लास्टरचे काम होत असून, हे कामही सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता दिसून येत नाही. हिवाळी अधिवेशन मुंबईला होत असल्याने सफारीच्या योजनेला ब्रेक लागताना दिसत आहे.
सफारीसाठी हवे १० वाघ
सूत्रानुसार इंडियन सफारीसाठी चार वाघ आणि सहा वाघिण असे १० वाघ ठेवण्याची योजना आहे. याशिवाय अधिक संख्येने बिबट ठेवण्यात येणार आहेत. सध्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये ५ वाघ आणि २० बिबट आहेत. या वन्यप्राण्यांच्या प्रदर्शनासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा(नवी दिल्ली)ची परवानगी आवश्यक आहे. याशिवाय अन्य प्राणिसंग्रहालयातून वाघ आणण्यासाठीही प्राधिकरणाकडे मागणी करून मान्यता मिळविणे आवश्यक आहे.
प्रस्ताव बघावा लागेल
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य बी.के. गुप्ता यांनी सांगितले की, इंडियन सफारीसाठी वाघ आयात करणे व प्रदर्शनासाठी आवश्यक परवानगी प्राधिकरणाकडून घ्यावी लागेल. सध्या गोरेवाडा वन्यजीव केंद्राकडून अशाप्रकारचा प्रस्ताव आला की नाही, हे बघावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमचे प्रयत्न सुरू
गोरेवाड्याचे विभागीय प्रबंधक व प्रकल्प नियंत्रक नंदकिशोर काळे यांनी सांगितले की, इंडियन सफारीसाठी बाहेरचे राज्य व इतर प्राणिसंग्रहालयातून वाघ व इतर वन्यप्राणी आणण्यासाठी प्राधिकरणाकडे परवानगी घेतली जाईल. आम्ही डिसेंबरपर्यंत सफारीचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.