आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ निर्मितीच्या प्रशिक्षणाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:08 AM2021-03-23T04:08:13+5:302021-03-23T04:08:13+5:30
नागपूर : महामारीच्या काळात आरोग्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि आरोग्य क्षेत्राचा कणा असलेल्या नर्सेसचे प्रशिक्षण कोरोनामुळे थांबले आहे. विदर्भात ...
नागपूर : महामारीच्या काळात आरोग्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि आरोग्य क्षेत्राचा कणा असलेल्या नर्सेसचे प्रशिक्षण कोरोनामुळे थांबले आहे. विदर्भात किमान शंभरच्या जवळपास स्वयंअर्थ सहायित व अनुदानित कॉलेजमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण देण्यात येते. नर्सिंग प्रशिक्षणात प्रात्यक्षिक हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु कोरोनामुळे कॉलेज बंद आहे आणि ऑनलाईन शिक्षणातून प्रशिक्षित नर्स घडविणे शक्य नाही. त्याचा परिणाम नर्सिंग कॉलेजच्या प्रवेशावरही पडला आहे.
खरे म्हणजे कोरोना महामारीच्या काळात नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात बसवून ऑनलाईन शिक्षण देणे हे चुकीचे आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या केसेस वाढल्या आहेत. मार्च २०२० पासून कॉलेज बंद असल्याने नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना घरातच बसून ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. जर कॉलेज सुरू असते तर या प्रशिक्षण घेणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा प्रशासनाने सेवा देण्यासाठी उपयोग करून घेतला असता, तर आरोग्य विभागाला मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करावा लागला नसता. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना रुग्णालयांमध्ये सेवा देणे हा अभ्यासक्रमाचाच भाग आहे. परंतु सरकारने कोरोनामुळे नर्सिंग कॉलेज बंद ठेवल्याने त्यांच्या प्रशिक्षणातील प्रात्यक्षिक भाग शिकविण्यातच आला नाही. कोरोनामुळे कॉलेज बंद असल्याचा परिणाम प्रवेशावरही झाला आहे. नवीन सत्रात नर्सिंगसाठी विद्यार्थिनींनी प्रशिक्षणाकडे पाठ दाखविली आहे. जसे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे कॉलेज सुरू आहे, शासकीय कॉलेजमधील नर्सिंगचे अभ्यासक्रम सुरू आहेत, त्याच धर्तीवर खासगी कॉलेजमधील नर्सिंगचे वर्ग सुरू करावे, अशी मागणी नर्सिंग कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशनचे सचिव प्रमोद वालमांडरे यांनी केली आहे.
- शिष्यवृत्तीही रखडल्या
महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक मंडळाने गेल्यावर्षीची परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये घेतली. तब्बल दोन महिने लोटून गेले तरी परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी प्रवेश घेता येत नाही. त्यातच महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २२ मार्चपर्यंतची होती. गेल्यावर्षीच्या परीक्षेचा निकाल अद्यापही न लागल्याने पुढील वर्षासाठी प्रवेश घेऊन शिष्यवृत्तीचे फॉर्म भरू शकत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या रखडल्या आहेत.