हुंड्यासाठी लग्न मोडले
By admin | Published: August 29, 2015 03:19 AM2015-08-29T03:19:59+5:302015-08-29T03:19:59+5:30
हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या आरोपीवर अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. किशोर चंद्रभान कुंभारे असे आरोपीचे नाव आहे.
भूखंड, दुचाकी अन् सोन्याची मागणी
नागपूर : हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या आरोपीवर अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. किशोर चंद्रभान कुंभारे असे आरोपीचे नाव आहे. तो डोंगरगाव (ता. हिंगणा) येथे राहतो. तो रेल्वेत नोकरी करीत असल्याचे सांगितले जाते. अजनीतील २० वर्षीय तरुणी बीएससीची विद्यार्थिनी असून, तिच्याशी संपर्क साधल्यानंतर त्याने तिला मागणी घातली. दोन्हीकडून बातचीत झाल्यानंतर १५ मे २०१५ ला साक्षगंधही करण्यात आले. यावेळी मुलीकडील मंडळींनी सोन्याची अंगठी, नवीन कपडे देऊन थाटामाटात साक्षगंधाचा कार्यक्रम केला. त्यासाठी त्यांना १ लाख २० हजार रुपये खर्च आला.
लग्नानंतर किशोर त्या मुलीला बाहेर फिरायला नेऊ लागला. लग्न होणार असल्यामुळे मुलीनेही नकार दिला नाही. दरम्यान, हे सर्व झाल्यानंतर आरोपीने लग्न करण्यापूर्वी हुंडा म्हणून प्लॉट, दुचाकी आणि सोन्याचे दागिने पाहिजे, अशी अट घातली. हे सर्व देण्यास असमर्थता दर्शविली म्हणून आरोपीने लग्नास नकार दिला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी किशोर व त्याच्या नातेवाईकांना समजावण्याचे प्रयत्न केले.
मुलीनेही किशोरचे मन वळविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आरोपीने नकार देतानाच तिला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. तो मानत नसल्याचे पाहून पीडित मुलीने गुरुवारी अजनी पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी किशोर व त्याच्या नातेवाईकांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायदा, विनयभंग तसेच धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले.(प्रतिनिधी)
सराईत लग्नमोड्या
आरोपी किशोर हा सराईत लग्नमोड्या आहे. त्याने यापूर्वीही अनेक तरुणी आणि त्यांच्या परिवाराची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याची चर्चा आहे. तो वेषांतर करून तरुणींच्या परिवारापुढे स्वत:ला एखाद्या कलावंताप्रमाणे सादर करतो. रेल्वेत नोकरी आणि चांगली शरीरयष्टी असल्यामुळे त्याला स्थळ मिळते. साक्षगंध करताना अंगठी, नवीन कपडे आणि काही रोखही हातात पडते. त्यानंतर तरुणीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने इकडे तिकडे नेतो. कुकर्म करतो. मन भरल्यानंतर कोणते तरी कारण पुढे करून तो तरुणी व तिच्या परिवाराशी संबंध तोडतो. बदनामीच्या धाकामुळे कुणी पोलिसात जाण्याची हिंमत करीत नाही. त्याचाच हा आरोपी गैरफायदा घेतो, अशी चर्चा आहे.