जुने वाडे व बंगल्यांमध्ये निवास अन् न्याहारीची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:08 PM2018-09-27T12:08:32+5:302018-09-27T12:15:33+5:30
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी ‘निवास आणि न्याहारी योजना’ हा अनोखा उपक्रम गेल्या काही वर्षांत राबविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध शहरात किंवा गावात असलेले वाडे किंवा पाटलांचे बंगले म्हणजे जुन्या काळातील वैभवाचे दर्शन करविणारे रूप आहेत. मात्र कालौघाने या वास्तूंना भग्न रूप आले आहे. पण हे वाडे किंवा पर्यटन स्थळांच्या आसपास अनेक वर्षांपासून रिकामे असलेले बंगले पर्यटकांच्या निवासासाठी महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. हा विचार करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी ‘निवास आणि न्याहारी योजना’ हा अनोखा उपक्रम गेल्या काही वर्षांत राबविला आहे.
महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी या योजनेबाबत माहिती दिली. राज्यातील विविध धार्मिक स्थळे, ऐतिहासिक महत्त्वाच्या जागा, समुद्र किनारे, डोंगरदऱ्या, जंगले आदी ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र अशा प्रत्येकच ठिकाणी महामंडळांची निवासी संकुले उपलब्ध नाहीत. अशा प्रत्येकच ठिकाणी निवास व्यवस्था उपलब्ध करणे आर्थिक आणि प्रशासनिकदृष्ट्या शक्य नाही. ही अडचण लक्षात घेता महामंडळाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शहरात किंवा गावातील पर्यटनस्थळाच्या आसपास घरमालकांनी बांधलेले दोन खोल्यांपासून दहा खोल्यांपर्यंतचे बंगले किंवा वाडे पर्यटकांना राहण्यासाठी भाड्याने दिले जाऊ शकतात.
लोकांनी बऱ्याच ठिकाणी अशी घरे किंवा फ्लॅट्स बांधले आहेत. मात्र तेथे कुणी राहत नसल्याने ते रिकामे पडले आहेत. महामंडळाने यामध्ये मध्यस्थाची भूमिका स्वीकारून घरमालक आणि पर्यटकांसाठी ही महत्त्वाची सोय उपलब्ध केली आहे. यानुसार इच्छा असलेल्या घरमालकांना अर्ज मागितले होते. यावर्षी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, २९ घरमालकांनी या योजनेसाठी महामंडळाकडे नोंदणी केली आहे.
यात नागपूर शहर व जिल्ह्यातील ११, चंद्रपूर जिल्ह्यातील १२, गोंदिया ४ तर भंडारा व वर्धेतून प्रत्येकी एकाने नोंदणी केली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी घरामध्ये पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सोईसुविधा असल्यास तत्काळ प्रमाणपत्र देण्याची व्यवस्थाही महामंडळाने केली असल्याचे हेडे यांनी सांगितले.
ज्येष्ठ पर्यटकांसाठी २० टक्के सूट
राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी महामंडळाच्या निवासी संकुलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सोमवार ते गुरुवार २० टक्के सवलत देण्यात येत आहे. याशिवाय शासकीय कर्मचारी सर्व दिवस १० टक्के, ४० टक्के दिव्यांग असलेल्यांसाठी २० टक्के, माजी कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के आणि ६ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सोमवारी ते शुक्रवार २० टक्के सवलत सवलत देण्यात येत असल्याची माहिती हनुमंत हेडे यांनी दिली.