कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक
By admin | Published: May 28, 2017 02:29 AM2017-05-28T02:29:24+5:302017-05-28T02:29:24+5:30
राज्य शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी यंदा जाहीर केलेले ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी ’अभियान यशस्वी करण्यासाठी
आदेश जारी : उन्नत शेतीने रोखला मार्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी यंदा जाहीर केलेले ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी ’अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक लावण्यात आला आहे. यासंबंधी राज्य शासनातर्फे अलीकडेच एक आदेश जारी करण्यात आला आहे. त्या आदेशानुसार मे महिन्यात बदलीस पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य शासनातर्फे कृषी विभागाच्या माध्यमातून २०१७-१८ च्या खरीप हंगामापासून राज्यात ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेंतर्गत कृषी विभागामार्फत शेती विकास आणि शेतकरी कल्याणाच्या विविध योजना, कार्यक्रम, आधुनिक कृषी औजारे तसेच कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सोबतच या मोहिमेत प्रमुख पिकांची प्रत्यक्षात प्राप्त होणारी उत्पादकता आणि त्या पिकांच्या अनुवांशिक उत्पादन क्षमतेची तफावत कमी करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त करून देणे, पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग करून घेणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षित करणे अपेक्षित आहे. अशास्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यास ही मोहीम राबविण्यास अडचण निर्माण होईल.
त्यामुळे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व कृषी सेवक या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
विशेष म्हणजे, मागील वर्षीसुद्धा उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबविण्यात आल्या होत्या. शिवाय यंदा पुन्हा सरकारने बदल्यांना ब्रेक लावल्यामुळे कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी थांबविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना आता एकाच ठिकाणी चार वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. त्यामुळे यावर्षी त्यांच्या बदल्या झाल्या नाहीत, तर त्यांना पाचवे वर्षसुद्धा काढावे लागणार आहे. मागील वर्षी कृषी खात्यात अचानक झालेल्या फेरबदलामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या रोखण्यात आल्या होत्या. शिवाय यावर्षी उन्नत शेतीने पुन्हा या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग रोखला आहे.