गर्लफ्रेंडशी ब्रेकअप अन् अल्पवयीन मुलीशी लग्नाचा घाट; तिच्या सतर्कतेने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 03:54 PM2022-04-30T15:54:45+5:302022-04-30T15:57:05+5:30
तिने पोलीस स्टेशन, उपायुक्त व पोलीस आयुक्त कार्यालयाला लेखी तक्रार केली. त्यामुळे हे प्रकरण बालसंरक्षण विभागाकडे पोहोचले.
योगेंद्र शंभरकर
नागपूर : प्रेयसीला धोका देऊन अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या प्रियकराच्या लग्नाचा बॅन्डबाजा प्रेयसीच्या सतर्कतेमुळे वाजलाच नाही. लग्नमंडपी बालसंरक्षण विभागाचे पथक व पोलीस कर्मचारी पोहोचल्याने हे लग्न थांबविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पारडी येथील २४ वर्षीय नीलेश(बदललेले नाव)चे २३ वर्षीय नेहा (बदललेले नाव) हिच्याशी प्रेमसंबंध होते. काही महिन्यापूर्वी नीलेश व नेहाचा ब्रेकअप झाला होता. मात्र नीलेशचे पारडी येथील एका अल्पवयीन मुलीशी जवळीक वाढल्याचे नेहाला कळले होते. नीलेशचे त्या अल्पवयीन मुलीशी २७ एप्रिलला लग्नही ठरले होते. नीलेशच्या स्वभावानुसार तो त्या अल्पवयीन मुलीलाही धोका देईल, असे नेहाला वाटले.
तिने पोलीस स्टेशन, उपायुक्त व पोलीस आयुक्त कार्यालयाला लेखी तक्रार केली. त्यामुळे हे प्रकरण बालसंरक्षण विभागाकडे पोहोचले. बाल संरक्षण विभागाचे पथक व पोलीस लग्नास्थळी पोहोचले. तिथे मुलीच्या जन्मदाखल्याची तपासणी केली असता, ती अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा विवाह थांबविण्यात आला. मुलीच्या पालकांना १८ वर्षाच्या आत लग्न केल्यास कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद दिली.
- तक्रारीबाबत गुप्तता ठेवण्यात आली
सूत्रांच्या माहितीनुसार नीलेश गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नेहाच्या तक्रारीबाबत बाल संरक्षण विभागाकडून गुप्तता बाळगण्यात आली. बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्याकडून विभागाला सूचना मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळावर पोहोचून चाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात आली.