स्तनाच्या कर्करोगाविषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 12:15 PM2021-10-17T12:15:30+5:302021-10-17T12:38:41+5:30
ऑक्टोबर महिना हा स्तन कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो.
नागपूर : भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण दिसून येत आहे. दरवर्षी १ लाख ८० हजार महिला स्तनाच्या कर्करोगाला बळी पडत असल्याचा अंदाज आहे.
आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या युगात आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडत आहेत. त्यातल्या त्यात खाण्यापिण्याच्या सवयी, स्पर्धेचे युग, तणावपूर्ण जीवनासह पाश्च्यात्य संस्कृतीच्या अनुकरणाचा कळत नकळत परिणाम आपल्या शरीरावर होतो. दिवसेंदिवस विविध आजारांच्या प्रमाणातही वाढ होत आहे, त्यात महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हे एकूण कॅन्सरपैकी जवळपास १४ टक्के असल्याची माहिती आहे.
ऑक्टोबर महिना हा स्तन कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो. एखाद्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हा कर्करोग झाला असेल त्यांना इतरांपेक्षा हा रोग होण्याची शक्यता जास्त असते.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे -
- स्तनात किंवा स्तनाच्या बाजूला व काखेत गाठ येणे
- स्तनाच्या आकारात बदल होणे
- स्तनाग्रातून रक्त किंवा तत्सम प्रकारचा स्राव होणे
- स्तनाची त्वचा लालसर होणे
स्तनाचा कर्करोग हा मुख्यत्वे महिलांमध्ये आढळत असला, तरी पुरुषांमध्ये देखील स्तनाचा कर्करोग पाहिला गेला आहे. पण पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. तर, महिलांमध्ये या आजाराचे दिवसेंदिवस वाढतच असून धावपळीचे जीवन धोक्याची घंटा ठरत आहे.
टाळण्यासाठी हे करा -
- मद्यपान टाळा
- मर्यादित हार्मोनल थेरपी
- निममित व्यायाम
- संतुलित आहार
- ८ ते ९ तासांची झोप आवश्यक
स्तन कॅन्सरच्या धोक्यापासून सावध राहण्यासाठी वीस वर्षांवरील सर्व महिलांनी ‘ सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशन ‘, म्हणजेच स्तनाची स्वतः तपासणी करणे आवश्यक आहे. सोबतच, वयाच्या तिशी-पस्तीशीनंतर वर्षातून एकदा मॅमोग्राफी करणे गरजेचे आहे. जर स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ, किंवा सूज आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हा आजार जरी गंभीर स्वरुपाचा असला, तरी वेळेत निदान झाल्यास, व योग्य औषधोपचार झाल्यास हा आजार संपूर्ण बरा होऊ शकतो. हा रोग बरा झाल्यानंतर महिला, इतर महिलांप्रमाणेच सामान्य आयुष्य जगू शकते. या आजाराचे वेळेत निदान झाल्यास औषधोपचार सोपे, कमी वेळेसाठी आणि कमी खर्चाचे होतात.