स्तन कर्करोग जनजागृती महिना; तरुण वयात धोकादायक ठरतोय ‘ब्रेस्ट कॅन्सर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2022 08:58 PM2022-10-07T20:58:37+5:302022-10-07T21:22:20+5:30
Nagpur News पूर्वी वाढत्या वयासोबत स्तनाचा कर्करोगाची जोखमी वाढायची. आता ३० ते ४० वर्षे वयोगटातील महिलांमध्येही स्तनाचा कॅन्सर दिसून येऊ लागला आहे.
नागपूर : पूर्वी वाढत्या वयासोबत स्तनाचा कर्करोगाची जोखमी वाढायची. आता ३० ते ४० वर्षे वयोगटातील महिलांमध्येही स्तनाचा कॅन्सर दिसून येऊ लागला आहे. धक्कादायक म्हणजे याचे प्रमाण ५० टक्के आहे. यामागील नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र, या वयात हार्माेन उग्र राहत असल्याने कॅन्सर झपाट्याने पसरतो. भारतात स्तनाच्या कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये ३९.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ऑक्टोबर हा महिना स्तन कॅन्सर जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया बोलत होते. ते म्हणाले, दरवर्षी स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) जवळपास दोन टक्क्यांनी वाढत आहे. शहरी भागात महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर पहिल्या स्थानावर, तर ग्रामीण भागात गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर पहिल्या स्थानावर आहे.
- देशात दरवर्षी एक लाखांवर अधिक महिलांना कर्करोग
भारतात २०२१ मध्ये १ लाख ७८ हजार ३६१ नवीन स्तन कर्करोगाची प्रकरणे आढळून आली. यात ९० हजार रुग्णांचा मृत्यू झाला. पाश्चात्य जगाच्या तुलनेत भारतात दिसत असलेल्या या कर्करोगाचा ‘ट्रेंड’ अधिक घातक आहे.
- स्तनाचा कॅन्सर का होतो?
जेव्हा स्तनातील सामान्य पेशी बदलतात आणि नियंत्रणाबाहेर वाढतात तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो. काही जोखीम घटक असलेल्या स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता इतरांपेक्षा अधिक असते.
- शहरात ३० पैकी एक महिलेला कॅन्सर
शहरात ३० पैकी एक महिलेला, तर ग्रामीण भागात ६० पैकी एका महिलेला हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. स्त्रियांमध्ये होणाऱ्या सर्व कर्करोगांपैकी ३० टक्के रुग्ण हे स्तनाचा कर्करोगाचे असतात. या रोगाचे तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात निदान होण्याचे प्रमाण ५० टक्के आहे.
-तरुण वयात स्तनाचा कर्करोग ‘ॲग्रेसिव्ह’
तरुण वयात स्तनांचा कर्करोग ‘ॲग्रेसिव्ह’ असतो. यामागील काही कारणांपैकी, हार्माेन्समध्ये बदल, उशिरा लग्न, उशिरा गर्भधारणा, अधिक मुले होऊ न देणे व अयोग्य स्तनपान ही काही कारणे आहेत. तरुण वयातील कॅन्सरमध्ये उपचारानंतरही रोग पसरण्याची किंवा परतून येण्याची शक्यता असते. या रोगाच्या लक्षणांची जनजागृती गरजेची आहे. स्तनात किंवा खाकेमधील गाठीची त्वरित तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरते.
- डॉ. सुशील मानधनिया, कर्करोग तज्ज्ञ