बोर्डाने सोडला सुटकेचा श्वास : शिक्षकांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:18 PM2018-03-05T23:18:15+5:302018-03-05T23:18:29+5:30
अनुदानासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची यादी घोषित करावी व डीसीपीएस योजनेत अंशदानाचा वाटा वाढवावा, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक आंदोलन करीत होते. त्यांनी बोर्डाच्या परीक्षेच्या मूल्यांकनावरही बहिष्कार घातला होता. सोमवारी मिळालेल्या आश्वासनानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे बोर्डानेही सुटकेचा श्वास सोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनुदानासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची यादी घोषित करावी व डीसीपीएस योजनेत अंशदानाचा वाटा वाढवावा, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक आंदोलन करीत होते. त्यांनी बोर्डाच्या परीक्षेच्या मूल्यांकनावरही बहिष्कार घातला होता. सोमवारी मिळालेल्या आश्वासनानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे बोर्डानेही सुटकेचा श्वास सोडला.
शिक्षकांच्या मागण्यांना घेऊन महासंघ व विज्युक्टाचे प्रतिनिधींनी शिक्षण राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेतली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, संजय शिंदे, अविनाश तळेकर, डॉ. अशोक गव्हाणकर, विलास जाधव, घोडके, मुकुंद आंधळकर हे उपस्थित होते. यावेळी शिक्षकांच्या मागण्यांवर चर्चा झाली. सकारात्मक चर्चेअंती शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले. सर्व शिक्षक मंगळवारपासून बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे कार्य सुरू करणार आहेत. बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी कनिष्ठ महाविद्यालयात पाठविण्यात आल्या आहेत. आंदोलनामुळे उत्तरपत्रिका कॉलेजच्या प्राचार्यांच्या ताब्यात आहेत. बोर्डाचे प्रभारी सचिव श्रीराम चव्हाण यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व वेळेवर निकाल लागण्यासाठी मूल्यांकनाचे कार्य वेगाने पूर्ण करण्यात येईल.