श्वास काेंडताेय अन् घामही गळताेय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:08 AM2021-05-17T04:08:11+5:302021-05-17T04:08:11+5:30
शरद मिरे भिवापूर : कोरोना रुग्ण म्हटले की, सहा नव्हे दहा फूट लांबच राहावे लागते. आता तर ग्रामीण भागातही ...
शरद मिरे
भिवापूर : कोरोना रुग्ण म्हटले की, सहा नव्हे दहा फूट लांबच राहावे लागते. आता तर ग्रामीण भागातही काेराेनाने विक्राळ रूप धारण केले आहे. अशा भयग्रस्त जीवघेण्या परिस्थितीत ‘ते’ रुग्णाच्या नाकातोंडाला स्पर्श करत ‘यमदूत’ ठरलेल्या विषाणूचे नमुने घेतात. पीपीई किट घालताना श्वास कोंडतो आणि अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. यादरम्यान हा कोरोना कधी नरडीच्या आत प्रवेश करेल, याचा नेम नाही. मात्र, तरीही ते तुमच्या आमच्या सुदृढ आरोग्यासाठी कोरोनाशी दोन हात करत आहेत.
५४ वर्षीय पंजाब दिगांबर धोटे असे या काेविड योध्द्याचे नाव. ते सोमनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्यसेवक आहेत. या संसर्गजन्य परिस्थितीत ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोनाचा संसर्ग धोक्याचा व जोखीमेचा आहे. मात्र, मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्था कोलमडू पाहात असल्याने पंजाब धाेटे हे आपल्या जिवाची पर्वा न करता स्वॅब टेस्टिंगचे काम करत आहेत. पीपीई किट घातल्यानंतर सुरू झालेले हे मिशन रांगेतील रुग्ण संपेपर्यंत अखंडित सुरू असते. रुग्णांना रांगेत ताटकळत राहावे लागू नये म्हणून ते जलदगतीने काम करतात. दरराेज ३०० ते ४०० रुग्णांचे स्वॅब घेतले जातात. संपूर्ण शरीरावर झाकलेली पीपीई किट चार ते पाच तासांनी काढताच, संपूर्ण शरीर घामाने ओलेचिंब झालेले असते. पीपीई किटमधील ते क्षण आव्हानात्मक असतात. काळजीपोटी घरून आलेला फोनसुद्धा उचलणे शक्य हाेत नाही. अशा कठीण काळात पंजाब धाेटे गेल्या वर्षभरापासून सेवा देत आहेत.
....
चला, थोडे गोड बोलूया!
रांगेतील रुग्ण, नातेवाईक अनेकदा काेविड चाचणीतील कर्मचाऱ्यांवर राग व्यक्त करतात. कधी दमदाटीचा प्रयत्न करतात. यामुळे कोरोनाशी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होते. परंतु आपण कृतज्ञतेने बोलल्यास त्यांनाही हिंमत मिळते आणि म्हणूनच चला, यापुढे त्यांच्याशी थोडे गोड बोलूया.
....
या संक्रमणाच्या संकटकाळात प्रत्येकाला मदतीची, सहानुभूतीची आवश्यकता आहे. माझे वय ५४ असले तरी, मिळेल ती जबाबदारी पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहे. स्वॅब घेणे निश्चितच जोखमीचे काम आहे. पीपीई किट घातल्यानंतर थोडा त्रास होतो. मात्र, पर्याय नाही. ही लढाई तुम्ही आम्ही सर्वजण निश्चित जिंकणार आहोत. यासाठी प्रत्येकाला काही दिवस काळजी घ्यावी लागेल.
- पंजाब धोटे, आरोग्य सेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र, सोमनाळा
===Photopath===
160521\img_20210516_182458.jpg
===Caption===
पंजाब धोटे फोटो