श्वास कोंडतोय !
By admin | Published: September 19, 2016 02:35 AM2016-09-19T02:35:47+5:302016-09-19T02:35:47+5:30
गणरायाचे विसर्जन आटोपले आणि आपण निश्चिंत झालो. मात्र विसर्जनानंतर पाण्यात मिसळलेल्या रसायनामुळे आम्लाचे प्रमाण वाढले
निशांत वानखेडे नागपूर
गणरायाचे विसर्जन आटोपले आणि आपण निश्चिंत झालो. मात्र विसर्जनानंतर पाण्यात मिसळलेल्या रसायनामुळे आम्लाचे प्रमाण वाढले असून आॅक्सिजनचे प्रमाण चिंताजनकरीत्या कमी झाले आहे. आॅक्सिजनचे प्रमाण घटणे तलावातील सजीव सृष्टीसाठी हानीकारक ठरणारे आहे. शिवाय तलावात साठलेल्या निर्माल्यामुळे तलावच नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रीन व्हिजील या संस्थेच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
आॅक्सिजन हा जसा मनुष्य प्राण्यासाठी प्राणवायू आहे तसा तो पाण्यातील जीवसृष्टीसाठीही महत्त्वाचा घटक आहे. जलचर पाण्यातील आॅक्सिजन शोषून घेतात.
तलावातील मासे किंवा इतर प्राण्यांच्या मरण्याच्या घटना कानावर पडत असतात. जैवीक घटकांवर बाह्य आक्रमण झाल्यास असा प्रकार घडतो हे संशोधनावरून समोर आले आहे. गेले दहा दिवस संपूर्ण शहर गणरायाच्या भक्तीत रंगले होते. मात्र ही आस्था इतर घटकांसाठी हानीकारक ठरू नये म्हणून प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र लोकांच्या भावनांसमोर हे प्रयत्न तोकडे पडले. कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन करूनही हजारो मूर्ती तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्या. त्यात केवळ मातीच्याच नाही तर पीओपीच्या मूर्तीही होत्या. त्यावर लावलेले रसायन आणि निर्माल्यामुळे होणारे विपरीत परिणाम आता समोर येत आहेत.