लाच मागणारा हवालदार अटकेत
By admin | Published: February 6, 2016 03:10 AM2016-02-06T03:10:25+5:302016-02-06T03:10:25+5:30
कारवाईचा धाक दाखवून एका शेतकऱ्याला ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले.
वाहतूक शाखेचा पोलीस : ५०० रुपयांसाठी भवितव्य धोक्यात
नागपूर : कारवाईचा धाक दाखवून एका शेतकऱ्याला ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले.
संजय श्रीधरराव शिंदे असे आरोपीचे नाव आहे. तो पश्चिम विभागाच्या वाहतूक शाखेत कार्यरत आहे.
कोतुर्णी येथील संजय नेवारे १ फेब्रुवारीला नागपूरहून पारशिवनीकडे जात होते. कोराडी नाक्यावर त्यांना तपासणीच्या नावाखाली पोलीस हवलदार शिंदेने थांबवले. दारू पिऊन असल्याचा आरोप करीत वाहनाची कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर कारवाई न करण्याच्या बदल्यात ५०० रुपयांची लाच मागितली. त्यावेळी पैसे नाहीत, असे म्हटले असता ५०० रुपये आणून कागदपत्रे घेऊन जा, असे शिंदे म्हणाला.
नेवारेने या प्रकाराची तक्रार एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे केली. त्यावरून शहानिशा केल्यानंतर २ फेब्रुवारीला सापळा लावण्यात आला. (प्रतिनिधी)
संशय आल्याने टाळाटाळ
नेवारे स्वत:च रक्कम देण्यासाठी उत्साह दाखवत असल्याने शिंदेला संशय आला. त्यामुळे त्याने २ फेब्रुवारीपासून लाच घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, तत्पूर्वी त्याने लाच मागितल्याचा पुरावा असल्यामुळे आज शिंदेविरुद्ध कोराडी ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक दिलीप कुंदोजवार, मोनाली चौधरी, मनोज गभने, शिपाई शंकर कांबळे, राजेंद्र जाधव यांनी ही कामगिरी केली.