सातबाऱ्यावर फेरफार करण्यासाठी दोन हजारांची लाच, महिला तलाठ्यासह दोघांना अटक
By योगेश पांडे | Published: November 22, 2023 09:40 PM2023-11-22T21:40:11+5:302023-11-22T21:40:35+5:30
शेतकऱ्याने आर्थिक अडचण असल्याचे सांगत दोन हजार रुपये देण्याची तयारी दाखवली.
नागपूर : सातबाऱ्यावर फेरफारीची नोंद करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून दोन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महिला तलाठी व कोतवालाला रंगेहाथ पकडण्यात आले. मौदा तालुक्यातील चाचेर तलाठी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
सुनिता नेमिचंद घाटे (५४, सन्मती भवन, जैन मंदिराजवळ, इतवारी) ही महिला तलाठी असून किशोर किसन वानखेडे (५४, चाचेर) असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. चाचेर येथील एका शेतकऱ्याच्या वडिलाचे निधन झाले व त्यांच्या मृत्यूपत्रानुसार वडिलोपार्जित शेतीचे सातबारावर फेरफार नोंद करून नाव समाविष्ट करायचे होते. संबंधित प्रक्रियेसाठी शेतकरी मौदा तालुक्यातील चाचेर तलाठी कार्यालयात गेला असता सुनिता घाटेने ३ हजार रुपयांची लाच मागितली.
शेतकऱ्याने आर्थिक अडचण असल्याचे सांगत दोन हजार रुपये देण्याची तयारी दाखवली. ती लाच कोतवाल किशोर वानखेडेकडे देण्याचे ठरले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने एसीबीकडे धाव घेतली. तक्रारीची शहानिश झाल्यावर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. बुधवारी दुपारी कार्यालयात कोतवालाने लाच घेऊन ती रक्कम घाटेकडे दिली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक शिवशंकर खेडेकर, प्रवीण लाकडे, सारंग बालपांडे, अस्मिता मल्लेलवार, आशु श्रीरामे, शारिक अहमद यांच्या पथकाने ही कारवाई केली.