पासपोर्ट पडताळणीसाठी दोन हजारांची लाच; दोन पोलीस कर्मचारी रंगेहाथ अडकले

By योगेश पांडे | Published: January 31, 2024 06:09 PM2024-01-31T18:09:06+5:302024-01-31T18:10:15+5:30

‘एसीबी’ची कारवाई : हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील कर्मचारी.

bribe of two thousand for passport verification two policemen were caught red handed | पासपोर्ट पडताळणीसाठी दोन हजारांची लाच; दोन पोलीस कर्मचारी रंगेहाथ अडकले

पासपोर्ट पडताळणीसाठी दोन हजारांची लाच; दोन पोलीस कर्मचारी रंगेहाथ अडकले

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : पासपोर्ट नूतनीकरणाच्या पडताळणीसाठी दोन हजारांची लाच मागणे हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले. ते लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकले व त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

राहुल दत्तात्रय महाकुळकर (पोलीस हवालदार) व नितीन पुरुषोत्तम ढबाले (पोलीस शिपाई) अशी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. एका व्यक्तीने पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. पासपोर्ट कार्यालयाकडून पडताळणीसाठी अर्ज हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आला. पडताळणीच्या सकारात्मक अहवालासाठी दोन्ही आरोपींनी समोरील व्यक्तीला दोन हजारांची लाच मागितली. त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने समोरील व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

विभागातील पथकाने प्राथमिक चौकशी केली व तक्रारीत तथ्य असल्याची बाब समोर आली. त्यानंतर सापळा रचण्यात आला व बुधवारी २ हजारांची लाच स्वीकारताना नितीन ढबालेला पकडण्यात आले. त्याची चौकशी केली असता राहुल महाकुळकरच्या सांगण्यावरून लाच घेतल्याची त्याने कबुली दिली. एसीबीच्या पथकाने त्यालादेखील ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वर्षा मते, आशीष चौधरी, अनिल बहिरे, आशू श्रीरामे, अमोल मेंघरे, असलेंद्र शुक्ला यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: bribe of two thousand for passport verification two policemen were caught red handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.