वॉरंट न काढण्यासाठी मागितली लाच : विधि व न्याय विभागाच्या चपराशास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 08:43 PM2019-09-25T20:43:18+5:302019-09-25T20:45:01+5:30
लाच न दिल्यास न्यायालयातून वॉरंट काढण्याची धमकी देणाऱ्या विधि व न्याय विभागाचा चपराशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या जाळ्यात अडकला. एसीबीने त्याला चार हजार रुपयाची लाच घेताना पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाच न दिल्यास न्यायालयातून वॉरंट काढण्याची धमकी देणाऱ्या विधि व न्याय विभागाचा चपराशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या जाळ्यात अडकला. एसीबीने त्याला चार हजार रुपयाची लाच घेताना पकडले. या कारवाईमुळे विधी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अब्दुल सलीम अब्दुल जब्बार (४५) असे आरोपीचे नाव आहे.
सलीम जिल्हा न्यायालय परिसरातील विधी व न्याय विभागाच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे चपराशी आहे. तो पूर्वी कामठीतील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात कार्यरत होता. तक्रारकर्ता भंडारा येथील खातरोड येथील रहिवासी आहे. तो कॉम्प्युटर मेकॅनिक आहे. २०१३ मध्ये त्याचे लग्न झाले होते. पत्नीने त्याच्यासह सासू-सासऱ्याविरुद्ध कामठी पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी कामठीतील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. तिथे तारखेवर जात असताना सलीमसोबत तक्रारकर्त्यांची ओळख झाली. सलीमने त्याला न्यायालयाशी संबंधित कुठलेही काम किंवा प्रकरण आपसी समझोत्याने सोडवून देत असल्याचे सांगितले. यानंतर तक्रारकर्त्यासह न्यायालयाकडून कुठलेही समन्स आले नाही. यामुळे तक्रारकर्ता निश्चिंत झाला. सात-आठ महिन्यांपूर्वी अचानक सलीमचे फोन येऊ लागले. तो तक्रारकर्त्यास चार हजार रुपयाची मागणी करू लागला. पैसे न दिल्यास आईवडील व त्याच्याविरुद्ध वॉरंट काढण्याची धमकी देऊ लागला. न्यायालयातील बाबूला सांगून कुठल्याही क्षणी वॉरंट काढेल, अशी धमकीही त्याने दिली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची भेट घेतली. त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली. एसीबीने प्राथमिक चौकशी केली असता तक्रार खरी असल्याचे आढळून आले. या आधारावर एसीबीने सलीमला पकडण्याची योजना आखली. सलीमने तक्रारकर्त्यास पैसे घेऊन छत्रपती चौकात बोलावले. एसीबीने तिथे सापळा रचला. तिथे चार हजार रुपये घेताना त्याला पकडले.
एसीबीने त्याच्या घराचीही झडती घेतली. या कारवाईमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली. सलीमची कामठीतून जिल्हा न्यायालयात बदली झाली आहे. यामुळे त्याचे तकारकर्त्याच्या प्रकरणाशी काहीही संबंध येत नाही. आरोपीने यापूर्वीही बरीच वसुली केल्याचा संशय आहे. यामुळे बदली झाल्यानंतरही तो तक्रारकर्त्यास त्रास देत होता. ही कारवाई एसीबी अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक संदीप जगताप, निरीक्षक गोरख कुंभार, हवालदार सुवील कळंबे, रविकांत डहाट, लक्ष्मण परतेकी आणि वकील शेख यांनी केली.
शासकीय अधिकारी-कर्मचारी हादरले
एसीबीने गेल्या दोन दिवसात शासकीय कार्यालयात दोन कारवाई केल्याने शासकीय अधिकारी व कर्मचारी हादरले आहेत. एसीबी अधीक्षकाचा पदभार सांभाळल्यानंतर रश्मी नांदेडकर यांनी एसीबीचा कारभार पारदर्शक करण्यावर भर दिला होता. त्यांच्या नियुक्तीपूर्वी ‘एसीबी’ मी टू प्रकरणामुळे राज्यभरात चर्चेत आले होते. यामुळे पहिल्यांदा महिला अधिकाऱ्यांकडे एसीबीचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.