लाचखोर अडकले

By admin | Published: September 3, 2015 02:29 AM2015-09-03T02:29:27+5:302015-09-03T02:29:27+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी महापालिका आणि सिटी सर्व्हे विभागातील दोन कर्मचाऱ्यांना दलालासह लाच घेतांना पकडले.

The bribe stuck | लाचखोर अडकले

लाचखोर अडकले

Next

कर निरीक्षक व सर्व्हेयरसह चौघांना अटक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची हॅट्ट्रिक
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी महापालिका आणि सिटी सर्व्हे विभागातील दोन कर्मचाऱ्यांना दलालासह लाच घेतांना पकडले. एसीबीने सलग दोन दिवसात तीन कार्यालयांवर कारवाई केली. मंगळवारी वाहतूक निरीक्षक आणि त्याच्या दलालाला पकडले होते. एसीबीच्या ‘हॅट्ट्रिक ’मुळे शासकीय विभाग हादरले आहेत.
पहिली कारवाई महापालिकेच्या धंतोली झोनमध्ये झाली. येथील कर निरीक्षक गोपाल रुसिया आणि दलाल अर्चना वासनिकला एसीबीने लाच घेतांना पकडले. भंडारा येथील डॉ. प्रदीप वैद्य यांचा काँग्रेसनगर येथे फ्लॅट आहे. त्यांनी आपला फ्लॅट भाड्याने दिला आहे. अर्चना धंतोली झोनमध्ये अधिकाऱ्यांची दलाली करते. तिने डॉ. वैद्य यांना फोन केला आणि म्हणाली ‘तुम्ही फ्लॅट भाड्याने दिला आहे. त्यांच्याकडून दरमहा १५ हजार रुपये भाडे घेता. त्यामुळे तुमच्या फ्लॅटवर व्यावसायिक कर लावला जाईल. तुम्हाला ८० हजार रुपये वार्षिक कर द्यावा लागेल. डॉ. वैद्य यांनी जेव्हा कर देण्याची तयारी दर्शविली तेव्हा अर्चनाने स्वत:ला धंतोली झोन कार्यालयातील कर्मचारी असल्याचे सांगितले. तसेच अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध असून प्रस्तावित संपत्ती करात वाढ करून व्यावसायिक कर लावणार नाही. यासाठी अर्चनाने ४० हजार रुपयाची मागणी केली. अर्चनाच्या मागणीमुळे डॉ. वैद्य चक्रावले, लाच देण्याची तयारी नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. २८ आॅगस्ट रोजी तक्रार खरी असल्याला दुजोरा मिळाला. योजनेनुसार डॉ. वैद्य यांनी बोलणी केली. ३५ हजार रुपयावर सौदा पक्का झाला. मंगळवारी अर्चनाने डॉ. वैद्य यांना फोन करून बुधवारी पैसे घेऊन यायला सांगितले. ठरलेल्या योजनेनुसार एसीबीची चमू डॉ. वैद्य यांच्यासह धंतोली झोन कार्यालयात पोहोचली. अर्चनाने डॉ. वैद्य यांना पैसे घेऊन दीनानाथ हायस्कूलजवळ बोलावले. तिने डॉ. वैद्य यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर रुसिया यांच्याशी संपर्क साधला. रुसियाने तिला सांगितले की, सध्या पैसे स्वत:जवळच ठेव नंतर हिशेब करू. यानंतर एसीबीचे निरीक्षक आसाराम सेटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रुसियाला धंतोली झोन कार्यालयातून अटक केली. अर्चना पूर्वी धंतोली झोनमध्ये डिमांड नोट वितरित करण्याचे काम करीत होती. ते काम बंद झाल्याने ती दलाली करू लागली. तिला प्रत्येक ग्राहकाच्या मोबदल्यात अडीच हजार रुपये मिळत होते. उर्वरित रक्कम कर निरीक्षक किंवा संबंधित अधिकारी स्वत: घेतात.
दुसऱ्या कारवाईत सिटी सर्व्हे विभागाचा सर्व्हेयर १० हजार रुपयाची लाच घेताना सापडला. सुधीर रामेश्वर कावरे (३५) रा. म्हाडा कॉलनी असे आरोपीचे नाव आहे. कळमना येथील यशवंत रहांगडाले यांचा कळमना येथे प्लॉट आहे. यशवंतला सिटी सर्व्हेमधील दस्तऐवजावर आपले नाव नोंदवायचे होते. यशवंत यांनी आपले कर्मचारी विजय बचाले यांना अधिकार पत्र देऊन सिटी सर्व्हेमध्ये अर्ज केला. बचाले यांनी ११ जून रोजी अर्ज केला. सोबत यासंदर्भात कावरे यांच्याशी भेट घेतली. कावरेने १० हजार रुपयाची मागणी केली. रहांगडाले यांनी एसीबीकडे तक्रार केली. ठरलेल्या योजनेनुसार कावरेने बुधवारी दुपारी अजनी चौकात पैसे घेऊन बोलावले. तिथे त्याला रंगेहात पकडण्यात आले.(प्रतिनिधी)
संपातही कारवाई
बुधवारी शासकीय कर्मचाऱ्यांचा संप होता. या संपादरम्यानच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा हादरून गेले. संपादरम्यान दिवसभर या कारवाईचीच चर्चा होती. एसीबीने कारवाई यशस्वी करण्यासाठी वर्धा आणि चंद्रपूरच्या चमूची मदत घेतली.
प्रत्येक ठिकाणी दलाल
एसीबीने नुकत्याच केलेल्या कारवाईत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसह दलालही सापडले आहेत. गेल्या आठवड्यात नेहरूनगर झोनमध्ये उपअभियंत्याला ओसीडब्ल्यू कर्मचाऱ्याच्या माध्यमातून लाच घेतांना पकडण्यात आले. आरटीओ आणि धंतोली झोनमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत सुद्धा दलाल सापडले. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये दलालांचे साम्राज्य असल्याचे उघडकीस आले आहे.

Web Title: The bribe stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.