पीसीआर न घेण्यासाठी लाच मागणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:07 AM2021-05-18T04:07:52+5:302021-05-18T04:07:52+5:30
‘एसीबी’ची पाचगाव येथे कारवाई : १० हजार रुपयांची मागणी लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : डिझेलचाेरी प्रकरणात अटक केलेल्या आराेपीला ...
‘एसीबी’ची पाचगाव येथे कारवाई : १० हजार रुपयांची मागणी
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : डिझेलचाेरी प्रकरणात अटक केलेल्या आराेपीला तपासकार्यात सहकार्य करीत न्यायालयात जामीन मिळावा म्हणून पीसीआर (पाेलीस कस्टडी रिमांड) मागणार नाही, यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पाेलीस उपनिरीक्षक व हवालदार या दाेघांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी (ॲन्टी करप्शन ब्युराे)च्या पथकाने अटक केली. ही कारवाई पाचगाव येथे साेमवारी (दि. १७) दुपारी करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाेलीस उपनिरीक्षक भारत रमेश थिटे (३०) व हवालदार अमित शंकर पवार (२८) या दाेघांचा समावेश आहे. दाेघेही कुही पाेलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाचगाव येथील पाेलीस चाैकीत कार्यरत असून, अमित हा भारत थिटे यांचा रायटर आहे. तक्रारकर्ता हा माेठा ताजबाग, चिटणीसनगर, नागपूर येथील रहिवासी असून, त्याला ट्रकच्या टँकमधील डिझेल चाेरीच्या प्रकरणात भादंवि ३७९, ५११, ४११, ३४ अन्वये अटक करण्यात आली हाेती. यात तक्रारकर्त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, त्याला जामीन मंजूर व्हावा म्हणून न्यायालयात पाेलीस काेठडीची मागणी केली जाणार नाही, अशी बतावणी उपनिरीक्षक भारत थिटे यांनी तक्रारकर्त्यास केली आणि त्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. त्याअनुषंगाने न्यायालयाने तक्रारकर्त्यास जामिनावर सुटका केली.
तक्रारकर्त्यास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार नाेंदविली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची शहानिशा केली. त्यात त्यांना सत्यताही आढळून आली. त्यामुळे त्यांनी साेमवारी पाचगाव पाेलीस चाैकी परिसरात सापळा रचला. तपास कार्यात सहकार्य केल्याबद्दल लाचेचा पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीच्या पथकाने उपनिरीक्षक भारत थिटे व हवालदार अमित पवार यांना रंगेहाथ अटक केली.
याप्रकरणी कुही पाेलीस ठाण्यात दाेघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविण्यात आला. ही कारवाई एसीबीच्या पाेलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पाेलीस अधीक्षक मिलिंद ताेतरे यांच्या मार्गदर्शनात एसीबीच्या पाेलीस निरीक्षक संजीवनी थाेरात व विनाेद आडे, रविकांत डहाट, सुशील यादव, अमाेल मेनघेरे, पंकज अवचट, रेखा यादव, प्रमाेद पिंपळकर, प्रिया नेवारे यांच्या पथकाने केली.