लाचखोर महिला पोलीस अडकली
By admin | Published: September 20, 2016 02:26 AM2016-09-20T02:26:02+5:302016-09-20T02:26:02+5:30
तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी साडेपाच हजारांची लाच मागणारी कळमन्यातील महिला पोलीस
कारवाईसाठी साडेपाच हजार मागितले : तीन हजार घेताना एसीबीने पकडले
नागपूर : तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी साडेपाच हजारांची लाच मागणारी कळमन्यातील महिला पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकली. मनीषा अरुण साखरकर (वय ४८) असे तिचे नाव आहे.
फिर्यादी संतोषराव पोहनकर मूळचे जबलपूरचे असून सध्या ते कळमन्यात राहतात. त्यांची पीठाची चक्की आहे. पत्नी आणि तिच्या नातेवाईकांसोबत पोहनकर यांचा वाद सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून त्यांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारअर्जाची चौकशी हवालदार मनीषा साखरकर हिच्याकडे होती. तिने पोहनकर यांच्याशी संपर्क साधून ५५०० रुपये दिले तरच गैरअर्जदारांवर कारवाई करेन, अशी अट घातली. लाच दिल्याशिवाय कारवाई होणार नाही, असेही बजावले.
आधीच त्रस्त असलेल्या पोहनकर यांच्याकडे साखरकर हिने लाचेच्या पैशासाठी तगादा लावला. त्यामुळे पोहनकर यांनी एसीबीचे अधीक्षक संजय दराडे यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दराडे यांनी सापळा लावण्याचे निर्देश दिले.
ठरल्याप्रमाणे एका पंचासह पोहनकर साखरकर हिच्याकडे गेले. साडेपाच हजार एकमुश्त देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. तेव्हा साखरकर हिने आज तीन हजार द्या, नंतर अडीच हजार द्या, असे सांगितले. त्यानुसार, पोहनकर लाचेचे तीन हजार आणि एसीबीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सोमवारी दुपारी १.३० वाजता कळमना ठाण्यात गेले.
लाचखोरीसाठी चर्चित
एसीबीने लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडलेली मनीषा साखरकर ही महिला पोलीस कर्मचारी कळमना ठाण्यात लाचखोरीसाठी चर्चित होती. तिच्याकडे आलेल्या तक्रार अर्जाशी संबंधित (फिर्यादी आणि आरोप) व्यक्तींना लाचेसाठी अक्षरश: धारेवर धरायची. सहा महिन्यांपूर्वी तिने अशाच प्रकारे एका गरीब तरुणाला पैशासाठी लग्न करण्यास नकार दिल्याच्या आरोपावरून कारवाईची धमकी दिली होती. त्याच्याकडून चिरीमिरी उकळण्यासाठी तिने त्याला प्रचंड मानसिक त्रास दिला होता.