सावनेर नगर पालिकेचा लाचखाेर अभियंता अटकेत; २० हजारांची लाच घेताना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 03:22 PM2023-03-24T15:22:04+5:302023-03-24T15:25:13+5:30
घरकुल लाभार्थ्याला मागितली २५ हजार रुपयांची लाच
सावनेर (नागपूर) : पंतप्रधान घरकुल याेजनेच्या लाभार्थ्याला अनुदानाची तिसऱ्या टप्प्यातील रकमेचा चेक देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागत २० हजार रूपये स्वीकारणाऱ्या सावनेर नगर पालिकेच्या अभियंत्यासह अन्य एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई सावनेर शहरातील नगर परिषद कार्यालय परिसरात गुरुवारी (दि. २३) सायंकाळी करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या लाचखाेर आराेपींमध्ये अभियंता नितीन विनायकराव मदनकर (४१, रा. जुना बगडगंज, गरोबा मैदान, नागपूर) व विलास देवराव राऊत (३८, रा. रेल्वेस्थानक मागे, सावनेर) या दाेघांचा समावेश आहे. नितीन मदनकर सावनेर नगर पालिकेत तांत्रिक अभियंतापदी कार्यरत आहे.
तक्रारकर्ता सावनेर शहरातील रहिवासी असून, त्याला पंतप्रधान घरकुल याेजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. घरकुलाचे बांधकाम केल्याने त्याला तिसऱ्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम हवी हाेती. या अनुदानाचे वाटप करण्याची जबाबदारी नितीन मदनकरवर साेपविली हाेती. त्याने अनुदानाची रक्कम देण्यासाठी तक्रारकर्त्यास २५ हजार रुपयांची मागणी केली हाेती. तडजाेडीअंती २० हजार रूपये देण्याचे तक्रारकर्त्याने मान्य केले. या व्यवहारात विलास राऊत हा एजंट म्हणून काम करायचा.
यासंदर्भात तक्रारकर्त्याने एसीबीच्या नागपूर कार्यालयात तक्रार नाेंदविली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची पडताळणी करीत गुरुवारी सापळा रचला. तक्रारकर्त्याकडून नितीन मदनकरच्या वतीने विलास राऊत याने २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने विलाससह नितीन मदनकर यास ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून २० हजार रूपये जप्त करण्यात आले असून, सावनेर पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.