नागपुरात सीबीआयने पकडला लाचखोर अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:04 PM2019-03-18T12:04:11+5:302019-03-18T12:06:12+5:30
विविध कंपन्यात मनुष्यबळ पुरविणाऱ्या एका कंपनीचालकाला कारवाईचा धाक दाखवून तीन लाखांची लाच मागणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाच्या (ईपीएफओ) एका अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) पथकाने रविवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध कंपन्यात मनुष्यबळ पुरविणाऱ्या एका कंपनीचालकाला कारवाईचा धाक दाखवून तीन लाखांची लाच मागणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाच्या (ईपीएफओ) एका अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) पथकाने रविवारी अटक केली. ए. बी. पहाडे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो अंमलबजावणी अधिकारी असल्याचे समजते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध कंपन्यांना मनुष्यबळ पुरविणाऱ्या एका कंपनीचे सात वर्षांपासून आॅडिट झाले नव्हते. पहाडे यांनी या कंपनीच्या संचालकाला तशी सूचना देऊन संभाव्य कारवाईचा धाक दाखवला. हे सर्व टाळायचे असेल तर तुम्हाला साडेतीन लाख रुपये लाच द्यावी लागेल, असे म्हटले. कोणतीही गडबड नसल्याने एवढी रक्कम लाच म्हणून देणे शक्य नसल्याने संबंधित कंपनीच्या संचालकांनी पहाडेंना रक्कम कमी करण्यास सांगितले. पहाडेंनी साडेतीन वरून तीन लाख रुपयात सौदा पक्का करण्याची तयारी दर्शविली. त्यापेक्षा एक रुपयाही कमी घेणार नसल्याचे पहाडेंनी म्हटल्याचे समजते. त्यामुळे कंपनी संचालकांनी त्याची स्थानिक सीबीआय अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली.
सीबीआयने शहानिशा करून घेतल्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे कारवाईचा सापळा लावला. कंपनी संचालकाने ठरल्याप्रमाणे ५० हजारांची पहिली किस्त घेण्यासाठी पहाडेंना लक्ष्मीनगरातील एका हॉटेलमध्ये रविवारी दुपारी बोलविले. तेथे पोहचलेल्या पहाडेंनी लाचेचे ५० हजार रुपये स्वीकारताच त्यांना सीबीआयच्या पथकाने अटक केली. ही कारवाई सीबीआयचे अतिरिक्त अधीक्षक एस. डी. मिश्रा यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक नीरजकुमार गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
वरिष्ठाचे नाव घेतले
या कारवाईनंतर सीबीआयच्या पथकाने पहाडेंच्या लक्ष्मीनगरातील घर आणि कार्यालयाचीही झडती घेतली. त्या झडतीत मालमत्तेची कागदपत्रे आणि रोख सापडल्याची चर्चा होती. दुसरे म्हणजे, लाच घेताना पकडल्यानंतर पहाडेने ही लाच आपण एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी घेतल्याचा कांगावा केला. या संबंधाने सीबीआय अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.