दोन वर्षांपासून मेयोमध्ये सक्रिय होता लाचखोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 08:59 PM2019-09-25T20:59:57+5:302019-09-25T21:00:41+5:30
नोकरी लावून देण्यासाठी (डीन) अधिष्ठात्यांच्या नावावर आठ लाख रुपयाची लाच मागणारा जावेद पठाण गेल्या दोन वर्षांपासून मेयो रुग्णालयात सक्रिय होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरी लावून देण्यासाठी (डीन) अधिष्ठात्यांच्या नावावर आठ लाख रुपयाची लाच मागणारा जावेद पठाण गेल्या दोन वर्षांपासून मेयो रुग्णालयात सक्रिय होता. यादरम्यान नोकरी लावून देणे, उपचारासाठी आवश्यक दस्तावेज बनवून देणे आदींच्या नावावर त्याने लोकांची फसवणूक केली. रुग्णालयातील अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांपर्यंत यातील एकही घटना पोहोचली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एसीबीने मंगळवारी सायंकाळी जावेद पठाण याला एका ऑटोचालकाकडून २० हजार रुपयाची लाच घेताना पकडले. प्रवाशांना मेयो रुग्णालयात सोडल्यानंतर ऑटोचालकाची जावेदसोबत ओळख झाली होती. तेव्हा त्याने आपली ओळख मेयोमध्ये तंत्रज्ञ असल्याची सांगितली होती. त्याने ऑटोचालकाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. रुग्णालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया आणि सहारे बाबू यांच्याशी आपली ओळख असल्याचे आणि त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार त्याच्याच माध्यमातून होत असल्याचा दावाही त्याने केला होता. जावेदने ऑटोचालकाला डीनच्या सरकारी वाहनावर चालक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. या मोबदल्याला त्याला आठ लाखाची लाच मागितली. पहिली किस्त म्हणून ५० हजार रुपये देण्यास सांगितले. ऑटोचालकाने एसीबीकडे तक्रार केली. याआधारावर एसीबीने जावेदला पकडण्याची योजना आखली. त्यांनी मंगळवारी सायंकाळी पठाणला २० हजार रुपये घेताना पकडण्यात आले. पकडल्या गेल्यानंतर जावेद हा स्वत:च्या भरवशावर लाच मागितल्याचे सांगत आहे. यात दुसऱ्या कुणाचीही भूमिका नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. प्रकरण गंभीर असल्याने एसीबी याची सखोल चौकशी करीत आहे.
या प्रकरणामुळे मेयो रुग्णालयातील अराजकताही उघडकीस आली आहे. येथे जवळपास १५० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. डॉक्टरांवरील हल्ल्यांमुळे त्यांना असामाजिक तत्त्वांना रुग्णालयात प्रवेशापासून रोखण्याचे आदेशही मिळालेले आहेत. यानंतरही जावेद दोन वर्षांपासून रुग्णालय परिसरात कसा काय सक्रिय होता. जावेदप्रमाणेच मेयो रुग्णालयात अनेक दलाल सक्रिय आहेत. ते रुग्णांकडून उपचारासाठी किंवा त्यासाठी लागणारे आवश्यक दस्तावेज बनवून देण्याच्या नावावर फसवणूक करतात. त्यांना रुग्णालय परिसरात फिरताना सहजपणे पाहता येते. जावेदने ऑटोचालकाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी खोटे दावे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यानला जावेदला न्यायालयासमोर सादर करून दोन दिवसाची कोठडी घेण्यात आली आहे.