मुलगा पसंत नसल्याने नवरीचा बोहल्यावर चढण्यास नकार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:55+5:302021-07-14T04:11:55+5:30
रामटेक : मुलगा पसंत नसल्याचे कारण देत ऐनवेळी नवरीने बोहल्यावर चढण्यास नकार दिला. त्यामुळे वाजत गाजत आलेल्या नवरदेवाला नवरीविनाच ...
रामटेक : मुलगा पसंत नसल्याचे कारण देत ऐनवेळी नवरीने बोहल्यावर चढण्यास नकार दिला. त्यामुळे वाजत गाजत आलेल्या नवरदेवाला नवरीविनाच लग्नमंडपातून परत जावे लागले. रामटेकच्या राजमहल रिसॉर्टमध्ये घडलेल्या या नाट्यमय प्रकारात पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही पक्षाच्या सामंजस्याने विवाह सोहळा रद्द केला.
मिळालेल्या माहितीनुसार खात (ता.मौदा) येथील मुलीचे लग्न अमरावती येथील मुलाशी जुळले होते. ठरल्याप्रमाणे रामटेकच्या राजमहल रिसॉर्टमध्ये मंगळवारी दुपारी १२ वाजता हा लग्नसोहळा होणार होता. मात्र नवरी मुलीने लग्नाच्या तासाभरापूर्वी ग्रामीण पोलीस कंट्रोल रूमला फोन करीत माझे कुटुंबीय जबरदस्तीने लग्न लावून देत असल्याची माहिती दिली. यासोबतच आपले दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याचेही तिने सांगतिले. कंट्रोल रूमने रामटेकचे ठाणेदार प्रमोद मकेश्वर यांना याबाबत अवगत केले. मकेश्वर यांनी याची दखल घेत दोन्ही पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तिथे झालेल्या चर्चेनंतर दोन्ही कुटुंबाने सामंजस्याने हा सोहळा रद्द करण्याचे ठरविले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वधू-वरमंडळी सोमवारी (दि. १२) जुलै रोजी सायंकाळी राजमहल रिसार्ट येथे दाखल झाली होती. रितीरिवाजनुसार सोमवारी रात्री उत्साहात हळदीचा कार्यक्रमही पार पडला. या लग्नाचा सर्व खर्च वरमंडळीकडून केला जात होता. मात्र मुलीचे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, याची पुसटशीही कल्पना त्यांना आली नाही. मुलीने ८ दिवसापूर्वी तिच्या आईला अमरावतीचा मुलगा पसंत नसून आपले दुसऱ्यावर प्रेम असल्याचे सांगितले होते. मात्र तिच्याकडे कुटुंबीयांनी दुर्लक्ष केल्याने शेवटी तिने पोलिसांची मदत घेत हे लग्न रद्द केले.