वहिनीनेच केला दिराचा 'गेम'
By Admin | Published: May 8, 2014 12:42 AM2014-05-08T00:42:31+5:302014-05-08T00:42:31+5:30
कोंडेश्वर मार्गावरील चांदापूर जंगलात नितीन हिंगासपुरेचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. या प्रकरणाचे गूढ उलगडले असून वहिनीनेच सुपारी देऊन दीर नितीनची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे
नितीन हिंगासपुरे हत्याकांड : सुपारी किलरसह चौघांना अटक
बडनेरा : कोंडेश्वर मार्गावरील चांदापूर जंगलात नितीन हिंगासपुरेचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. या प्रकरणाचे गूढ उलगडले असून वहिनीनेच सुपारी देऊन दीर नितीनची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन सुपारी किलरसह चौघांना अटक केली आहे.
मेघा श्याम हिंगासपुरे (२८,रा. नंदनवन कॉलनी), समीर ऊर्फ अब्दुल गनी अब्दुल नजीर (२६, रा. काजीपुरा, कारंजा लाड), आनंद रमेश गायकवाड (२१) व गजानन महादेव भोंगळे (२0, दोन्ही रा.भारतीपुरा कारंजा लाड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. नितीन हिंगासपुरे याची ५ मे रोजी मारेकर्यांनी हत्या करुन त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून कोंडेश्वर ते अंजनगावबारी मार्गावरील चांदापूर जंगलात फेकून दिला होता. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी हत्या व पुरावा नष्ट करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मृत नितीनच्या हातावरील टॅटूवर 'मेघा' नाव गोंदलेले होते.
पोलिसांनी नितीनचे दोन मोबाईल घटनास्थळावरुन जप्त केले. यापैकी एका मोबाईलवर त्याची चुलत वहिनी मेघाचा शेवटचा कॉल आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई मेघाकडे वळली. या आधारावर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मेघाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आधी मेघा ही पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होती. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच मेघाने गुन्ह्याची कबुली दिली.