‘वर’ही शोधला आणि लग्नही केले थाटात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:37 AM2019-04-21T00:37:56+5:302019-04-21T00:39:17+5:30
राजकारणातील सामाजिक जिव्हाळा हरवत चालला असताना नागपुरातील शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत एका गरीब कुटुंबातील मुलीचा संसार थाटून दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकारणातील सामाजिक जिव्हाळा हरवत चालला असताना नागपुरातील शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत एका गरीब कुटुंबातील मुलीचा संसार थाटून दिला.
मीनाक्षी ठाकरे असे मुलीचे नाव आहे. मीनाक्षीच्या वडिलांचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तिचा भाऊ सचिन याच्यावर आहे. पण सचिनचाही गेल्यावर्षी मृत्यू झाला. वडील आणि भावाच्या मृत्यूमुळे आई हर्षला हतबल झाली. मुलगी वयात आल्याने तिला लग्नाची चिंता भेडसावू लागली. लग्नासाठी पैसा नाही, त्यामुळे लग्न तरी कोण करणार, हा प्रश्न तिच्यापुढे ठाकला. या चिंतेने ग्रस्त असलेली मीनाक्षीची आई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांच्याकडे पोहोचली. त्यांच्यापुढे आपली परिस्थिती सांगितली. जिल्हा प्रमुख जाधव यांनी तिची आपबिती ऐकून ‘वर’ मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. शरद ढोके याची निवड करण्यात आली. परंतु शरद याचीही आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती. त्यामुळे त्याच्या घरचे लग्न करण्यास तयार नव्हते. अशात शिवसेनेने दोन्ही परिवाराच्या लग्नाचा खर्च उचलला. १९ एप्रिलला पारडी येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात दोघांचे लग्न संपन्न झाले. मुलीच्या आईच्या आग्रहास्तव जाधव यांनी कन्यादान केले. पूर्व नागपूर विधानसभेचे संघटक यशवंत रहांगडाले यांनी सांगितले,अतिशय थाटात लग्न करण्यात आले. दोन्ही कुटुंबाच्या नातेवाईकांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. या लग्नकार्यात शहर प्रमुख राजेश तुमसरे, नगरसेवक किशोर कुमेरिया, डॉ. रामचरण दुबे, शहर समन्वयक नितीन तिवारी, मुन्ना तिवारी, अशोक धापोडकर, राजा रामदवार, सुनील बॅनर्जी, अक्षय मेश्राम, योगेश न्यायखोर, सचिन डाखोरे, बंटी धुर्वे, कृष्णा चावके, हासीम रजा शेख, अरुण तायवाडे आदींचे सहकार्य लाभले.