शंभर नदी-नाल्यांवर ‘पूल-बंधारे’, ४० ते ५० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:51 PM2018-02-16T23:51:45+5:302018-02-16T23:51:53+5:30
राष्ट्रीय महामार्ग विकास संस्थेतर्फे महाराष्ट्रात १०० नद्या व नाल्यांवर ‘ब्रिज कम बंधारे’ म्हणजे एकाच जागेवर पूल व बंधारे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे दिली.
नागपूर : राष्ट्रीय महामार्ग विकास संस्थेतर्फे महाराष्ट्रात १०० नद्या व नाल्यांवर ‘ब्रिज कम बंधारे’ म्हणजे एकाच जागेवर पूल व बंधारे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे दिली.
केंद्रीय भूमी जल बोर्डातर्फे आयोजित ‘भूजल मंथन’ या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, विभागाचे सचिव यू.पी.सिंह, केंद्रीय भूमी जल बोर्डाचे अध्यक्ष के.सी.नाईक आदी उपस्थित होते. मराठवाड्यात उन्हाळ््यामध्ये रेल्वेमार्गाने पाणी आणण्याची वेळ आली होती. त्यामुळे तेथे भूजल पातळी वाढविण्याची अत्यावश्यकता आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेतच. मात्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडूनदेखील मराठवाड्यासह राज्यभरात १०० ठिकाणी पूल-बंधारे एकाच जागेवर बांधण्यात येतील.
यात विदर्भातील ३५ तर मराठवाड्यातील ५५ ‘पूल-बंधारे’ प्रकल्पांचा समावेश असेल. यामुळे ४० ते ५० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
पाकिस्तानला जाणारे पाणी थांबविणार
फाळणीनंतर भारत व पाकिस्तानमधील नद्यांचेदेखील हिस्से झाले. सिंधू करारानुसार भारतातील नद्यांचे पाणी पाकिस्तानमध्ये जात आहे. एकीकडे हरियाणा, दिल्ली, पंजाब येथे पाण्याची कमतरता असून देशातील पाणी पाकिस्तानला जात आहे. आम्ही ते पाणी थांबविणार असून नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून या नद्यांमधील पाणी हरियाणा, पंजाब, दिल्ली व उत्तर प्रदेशपर्यंत नेण्यात येईल, असे गडकरी यांनी सांगितले.