मांडवा-वाकेश्वर मार्गातील पूल उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:11+5:302021-06-22T04:07:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूूर : गेल्या आठवड्यात तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, मांडवा- वाकेश्वर मार्गावरील पुलावरील भाग उखडला ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूूर : गेल्या आठवड्यात तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, मांडवा- वाकेश्वर मार्गावरील पुलावरील भाग उखडला असून, भविष्यात हा पूल वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. या पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यातील मांडवा-वाकेश्वर या दोन गावांना जोडणाऱ्या मार्गावर नदी असून, त्यावर १३ पायल्यांच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले. हा पूल जुना असल्याने पुलाचा काही भाग जीर्ण झाला आहे. त्यामुळे या पुलाच्या देखभाल-दुरुस्तीची मागणी होत हाेती. अशातच १७ जून रोजी झालेल्या दमदार पावसामुळे नदीवरील पुलाचा भाग उखडला. पुलावरील सिमेंटीकरण उखडून तेथे मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. सध्या नदीपात्र पाण्याने तुडुंब भरले आहे. अशात अपघात झाल्यास मोठी अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, पुरामुळे पुलाचा इतर भागही वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य शरद आगे, प्रांजल भोयर, रमेश मढई, सुरेश वैद्य, दीपक इंगळे, टिकाराम वाईलकर, शिवा वाईलकर आदींसह गावकऱ्यांनी केली आहे.