कालव्यावरील पूल धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:41 AM2021-02-05T04:41:08+5:302021-02-05T04:41:08+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील काचूरवाही व किरणापूर शिवारातून गेलेल्या पेंच प्रकल्पाच्या कालव्याला आणि त्यावरील पुलाला जड वाहतुकीमुळे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यातील काचूरवाही व किरणापूर शिवारातून गेलेल्या पेंच प्रकल्पाच्या कालव्याला आणि त्यावरील पुलाला जड वाहतुकीमुळे तडा गेल्या आहेत. ही वाहतूक अजूनही सुरूच असल्याने पूल काेसळून अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराकडे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे, असा आराेप या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.
काचूरवाही-किरणापूर दरम्यानच्या पांदण रस्त्याच्या दुरुस्तीला मुख्यमंत्री सडक याेजनेंतर्गत मंजुरी देण्यात आली असून, निधी प्राप्त झाल्याने या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यात रस्त्याच्या मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. याच शिवारातून पेंच प्रकल्पाचा मुख्य कालवा व उपकालवा गेला आहे. त्यावर आवश्यक त्या ठिकाणी पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामासाठी लागणारा मुरुम व इतर साहित्याची वाहतूक कालव्याच्या कडेला असलेल्या राेड आणि पुलावरून अव्याहतपणे केली जात आहे.
या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे आधीच माेडकळीस आलेल्या कालव्यावरील पुलाला तडे गेले आहेत, शिवाय कालवा व मायनरच्या भिंतींनाही तडे जायला सुरुवात झाली आहे. ही बाब धाेकादायक असल्याने, या रस्त्यावरील ओव्हरलाेड वाहतूक बंद करावी, तसेच पाटबंधारे विभागाने तातडीने पूल, कालवा व मायनरची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष रमेश कारामोरे, काचुरवाहीचे सरपंच शैलेश राऊत, कल्पना नाटकर, उमेश महाजन, श्रीकांत बावनकुळे, गजानन भलमे, चंदू बावनकुळे, नंदू नाटकर, विनोद नाटकर, गजानन भलमे, गणेश तायवाडे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
...
अधिकाऱ्यांकडून जुजबी पाहणी
पुलाला गेलेले तडे आणि कालवा व मायनरची झालेली दुरवस्था याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना कळविले आहे. मध्यंतरी अधिकाऱ्यांनी या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र, त्या पुलाच्या दुरुस्तीसाठी किंवा त्यावरील ओव्हरलाेड वाहतूक थांबविण्यासाठी काहीही उपाययाेजना केल्या नाही, असेही या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले.