कृष्णा नदीवरील पूल धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:08 AM2021-01-02T04:08:48+5:302021-01-02T04:08:48+5:30
चंदू कावळे लाेकमत न्यूज नेटवर्क टाकळघाट : हिंगणा तालुक्यातील टाकळघाट-कान्हाेलीबारा मार्गावरील कृष्णा नदीवर असलेल्या पुलाचे बांधकाम ३८ वर्षापूर्वी करण्यात ...
चंदू कावळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
टाकळघाट : हिंगणा तालुक्यातील टाकळघाट-कान्हाेलीबारा मार्गावरील कृष्णा नदीवर असलेल्या पुलाचे बांधकाम ३८ वर्षापूर्वी करण्यात आले. खाेलगट व कमी उंची असलेल्या या पुलावरून अलीकडच्या काळात सतत रहदारी असते. संरक्षक कठडे तुटल्याने तसेच दुरुस्तीअभावी माेडकळीस आल्याने हा पूल धाेकादायक बनला आहे.
सन १९७९ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरानंतर सन १९८१-८२ मध्ये टाकळघाट-कान्हाेलीबारा राेडवर या पुलाची निर्मिती करण्यात आली. हा पूल व राेड टाकळघाट, गोंडवाना, पिपरी, किन्ही, भान्सुली, भीमनगर, खडकी, मांडवा, कान्हाेलीबारा व परिसरातील काही गावांना जाेडला आहे. त्या काळात या पुलावरून रहदारी कमी हाेती. शिवाय, पुलाची उंचीही कमी ठेवण्यात आली हाेती. औद्याेगिकीकरण व नागरीकरणामुळे या पुलावरून ओव्हरलाेड वाहनांसह कामगार, विद्यार्थी व नागरिकांची रहदारी वाढली आहे. या भागातील शेतकरीही शेतमालाची वाहतूक करण्यासाठी या मार्गासाेबतच पुलाचा वापर करतात.
या पुलावरील राेडला खड्डे पडले असून, ते बुजवण्यासाेबतच त्याला संरक्षक कठडे लावण्याची या भागातील नागरिकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली. परंतु, कुणीही या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. या पुलाची वजन सहन करण्याची क्षमताही कमी आहे. त्यामुळे वाढते औद्याेगिकीकरण व ओव्हरलाेड वाहतूक लक्षात घेता, या ठिकाणी उंच, रुंद व मजबूत पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे, अशी मागणीवजा प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
...
वळणदार मार्ग
टाकळघाट-कान्हाेलीबारा मार्ग वळणार आहे. या पुलाजवळ राेडला वळण असून, ताे खाेलगट आहे. त्यामुळे रात्रीच्यवेळी वाहनांच्या प्रकाशझाेतात पुलाच्या दाेन्ही बाजू वाहनचालकास व्यवस्थित दिसत नाही. हा पूल अरुंद असल्याने तसेच त्याचे संरक्षक कठडे तुटल्यामुळे ओव्हरटेक करताना किंवा क्राॅस करताना माेठी वाहने नदीत काेसळून अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावरील खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. पावसाळ्यात संततधार पाऊस असल्यास या पुलावरून पुराचे पाणी वाहत असते.